मुंबई- ग्लॅमरच्या दुनियेतला प्रकाशझोत क्षणभंगुर असू शकतो, मात्र भारतीय सिनेसृष्टीत असं एक नाव आहे जे सदैव तेजानं चमकत आलंय, ते म्हणजे अमिताभ बच्चन. त्यांचा कायमस्वरुपी करिष्मा आणि मोहून टाकणारी उपस्थिती यामुळे प्रश्न पडतो की आज 81 वर्षातही त्यांच्याबद्दल इतकं आकर्षण का वाटत राहतं? हेच आपण जाणून घेण्याचा एक प्रयत्न करुयात.
सवाल करोडो मोलाचा
पार्श्वसंगीत आणि प्रकाशाच्या झगमगाटात शोची सुरुवात होते. बॅक स्टेजमधून प्रचंड ऊर्जा असलेले 'बिग बी' त्यांच्या चिरपरिचित शैलीत धावत सेटवर येतात आणि डोळ्यांचं पारणं फिटून जातं. अमाप उत्साह, जबरदस्त जोश यासह ती मन मोहून टाकणारी एन्ट्री! हे 80 वर्षांचा टप्पा ओलांडलेलं व्यक्तिमत्त्व आहे, यावर कुणाचा सहज विश्वास बसेल? ‘कौन बनेगा करोडपती’ मंचावर 'बिग बीं'ना पाहणं हे कोणत्याही मोठ्या आश्चर्याहून कमी नाही. अलीकडेच केबीसीचा नवा सिझन सुरू झाला आणि तोच नवा जोम पाहायला मिळाला. वयाची आठ दशकं पार केल्यानंतर असा अद्भूत चमत्कार कोण करु शकतं, या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ऑप्शन एबी, अमिताभ बच्चन.
टीव्ही होस्टिंगचा सुपरहिरो
आपण त्यांना प्रेमानं 'बिग बी' म्हणतो. ते केवळ टेलिव्हिजन होस्ट नाहीत तर टीव्ही मनोरंजन क्षेत्रातले एक 'सुपरहिरो' आहेत. हॉट सीटवर बसलेल्या प्रत्येक स्पर्धकाशी आपुलकीने वागणं, वातावरण हलकं फुलकं ठेवण्यासाठी मिश्किल भाष्य करणं, हळूच चिमटा काढणं, आदरानं वागणं- बोलणं, संवेदनशीलपणा दाखवणं, प्रंसगी भावूक होऊन जाणं, समोरच्याला न दुखवता कधी डोळ्यात झणझणीत अंजन घालणं, अष्टावधानी राहून उत्स्फु्र्त बोलत राहणं, आपल्या चित्रपटातील संवाद सहज अस्खलित बोलणं अशा अनेक गोष्टींमुळे ते आमच्यासाठी टीव्ही होस्टिंगचे अनंत काळाचे 'सुपरहिरो' ठरतात. 'कौन बनेगा करोडपती'चा होस्ट म्हणून तर ते मनोरंजनाची लाईफ लाईन ठरतात.
पाण्यासारखे जादूगार बिग बी
आपल्या पहिल्या प्रश्नाकडं पर यायचं झालं तर बच्चन यांच्यात अशी कोणती गोष्ट आहे की जे इतरांहून वेगळं करतात. कोणत्याही पात्रात ते इतके सहज समरस होऊन जातात, हे एक रहस्य आहे. काही जण म्हणतात सिनेमाच्या जगात सर्व रंगात मिसळून जाण्याची त्यांच्याकडं अनोखी कला आहे. अतिशयोक्ती वाटेल, पण ब्रूस ली एकदा म्हणाले होते की, तुमचं मन रिकामं करा. पाण्यासारखं व्हा. बच्चन हे पाण्याच्या जादुगारासारखे आहेत. तुम्ही त्यांना ज्या आकारात ठेवाल त्या प्रमाणे ते आपला आकार धारण करतात. त्यांन कपात ठेवायचा प्रयत्न झाला तेव्हा ते कप होऊन जंजीर, शोले, दीवार, शक्ती, कालिया यांसारख्या चित्रपटांमध्ये 'अँग्री यंग मॅन' बनले. त्यांना बाटलीत ठेवायचा प्रयत्न झाला तेव्हा बाटलीचा आकार धारण करुन कभी कभी, सिलसिला सारख्या क्लासिक्समधील रोमँटिक नायक बनले. त्यांना चहाच्या भांड्यात ठेवायचा प्रयत्न झाला तेव्हा अभिमान, कस्मे वादे, पिकू, चीनी काम आणि पा मध्ये त्यांनी एक परिपक्व अभिनय सादर केला. तुम्ही त्यांनी सादर केलेली अमर अकबर अँथनी, नसीब, मर्द आणि शराबी चित्रपटामधील मॅड कॉमेडी विसरू शकाल का? त्यांनी किती दिग्दर्शकांसोबत काम केलंय, के ए अब्बास, यश चोप्रा, हृषीकेश मुखर्जी ते आर बाल्की, सुजॉय घोष ते अयान मुखर्जी ते प्रकाश मेहरा ते मनमोहन देसाई आणि सूरज बडजात्या ते नागराज मंजुळे! आणि अजूनही काम करत आहेत.
पुन्हा सवाल करोडो मोलाचा
तुमच्यासाठी एक साधा प्रश्न समोर ठेवत आहोत, पण खात्री आहे की याचं उत्तर तुम्ही कोणतीही लाईफ लाईन वापरुनही देऊ शकणार नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कितीही शोधलं तर निश्चित पर्याय तुम्हाला लॉक करणं कठीण आहे. तर प्रश्न आहे..यापैकी कोणत्या भूमिकेत बिग बी सर्वात जास्त चमकतात? तर या प्रश्नासाठी पर्याय आहेत...