मुंबई - Ambedkari Thoughts Movies : डॉ. भिमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या 'महामानवा'च्या 67 व्या 'महापरिनिर्वाण दिना'निमित्त देशबांधव त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आहेत. दरवर्षीचा शिरस्ता पाळत मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर लाखो अनुयायांनी हजर राहून त्यांना अभिवादन केलं. यावेळी अनेक कलाकारांनी भीमगीते, शाहिरी कवने, शोषितांच्या वेदना मांडणारी गाणी सादर करुन बाबासाहेबांचं स्मरण केलं. अनेक कला अविष्काराच्या माध्यमातून आजवर बाबासाहेबांना आठवलं जातं. चित्रकला, नाटक, चित्रपट या माध्यामांवरही आंबेडकरी विचारांचा मोठा पगडा आहे. समाजाचं प्रबोधन करण्याचं प्रभावी माध्यम म्हणून दिग्दर्शकांनी याचा उपयोग केलाय. अशाच काही प्रभावी चित्रपटांवर एक नजर टाकूयात.
जय भीम
टी. जे. ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेला 'जय भीम' हा चित्रपट 2021 मध्ये संपूर्ण जगभर चर्चेचा विषय ठरला होता. यामध्ये थेट बाबासाहेबांचं चरित्र अथवा त्याच्याशी संबंधीत कथा पाहायला मिळत नाही. पण त्यांच्या अनुयायांनी सामाजिक न्यायासाठी दिलेला 'जय भीम'चा नारा शीर्षक म्हणून वापरण्यात आलाय. हा चित्रपट पोलिसांचा पक्षपातीपणा आणि उपेक्षित समाजाचं होणार शोषण यावर भाष्य करणारा होता. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथा गुन्हेगार जमात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरुलर जमातीतील सेंगेनी आणि राजकन्नू या जोडप्याच्या जीवनाभोवती फिरते. सेंगेनी आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी चंद्रू या वकिलाची मदत घेते.
या चित्रपटाला देश-विदेशात अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. 2022 मध्ये या चित्रपटाची निवड 'ऑस्कर' पुरस्काराच्या नामांकनासाठी भारताच्या वतीनं करण्यात आली होती. तुमच्यापैकी अद्याप जर कोणी हा चित्रपट पाहिला नसेल तर आजच्या 'महापरिनिर्वाण दिना'निमित्त जरुर वेळ काढून पाहू शकता. मूळ तमिळ भाषेत असला तरी हा चित्रपट तुम्हाला 'अमेझॉन प्राईम व्हिडिओ' या ओटीटीवर हिंदी भाषेतही उपलब्ध आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. तमिळ, कन्नड, तेलुगू, मराठी या भाषेतून हे चित्रपट आहेत. 2000 मध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाची निर्मिती केली. यात दाक्षिणात्य सुपरस्टार मामुटी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (मामूट्टी) आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन (नितीन चंद्रकांत देसाई) यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. हा चित्रपट यूट्यूबवर तुम्ही पाहू शकाल.
हा चित्रपट भारतातील दलित आणि शोषित वर्गाच्या मुक्तीमध्ये बी आर आंबेडकरांचे जीवन आणि योगदान यांचं दर्शन घडवतो. कोलंबिया युनिव्हर्सिटीतल्या त्यांच्या कॉलेजच्या काळापासून ते स्वातंत्र्यलढ्यात ते कसे योगदान देतात, यानं चित्रपटाची सुरुवात होते. भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्यानं भारतीय राज्यघटनेला आकार देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार चित्रपटात दिसतो.
रमाबाई भीमराव आंबेडकर - 'रमाई'