मुंबई - बॉलिवूड स्टार राणी मुखर्जी गेली अडीच दशके प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आली आहे. अनेक सुपरहिट चित्रपट तिच्या नावावर आहेत. आघाडीच्या बॉलिवूड स्टार्ससोबत तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तिच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'कुछ कुछ होता है', 'वीर झारा', 'ब्लॅक' आणि 'मर्दानी' या सारख्या चित्रपटांचा समावेश असून या चित्रपटामधील तिच्या विलक्षण अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' हा तिचा अलिकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट प्रेक्षकांना भावूक करुन गेला. मुलांचे पालन पोषण न करता येणारी आई असा ठपका ठेवून सरकारने तिच्या दोन्ही मुलांना ताब्यात घेतलेल्या आईची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. राणीने साकारलेल्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले. कामाशिवाय ती आपल्या खासगी आयुष्यात ती उत्तम रमली आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आदित्य चोप्रासोबतच्या तिच्या लग्नाबद्दल आणि या खास दिवशी परिधान केलेल्या पोशाखाबद्दलचा खुलासा केला.
राणी मुखर्जी आणि चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा यांचा २०१४ मध्ये इटलीमध्ये एक भव्य आणि इंटिमेट विवाहसोहळा पार पडला होता. तिचा पती बॉलिवूडमधील मोठा निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळखला जात असतानाही राणीने लग्नानंतर तिचे सोशल मीडिया प्रोफाइल देखील निष्क्रिय केले होते. त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो कधीच सोशल मीडियावर झळकले नव्हते. पण अलीकडेच एका मुलाखतीत राणी मुखर्जीने आपल्या चाहत्यांसाठी लग्नाचे फोटो शेअर करण्याची तिची इच्छा बोलून दाखवली.
दुसर्या एका मुलाखतीत, राणी मुखर्जीने तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल आणि 'मर्दानी 3' बद्दल खुलासा केला. 'मर्दानी ३' हा चित्रपट तयार होईल का असे विचारले असता राणी म्हणाली की, 'होय, मला पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारायला आवडेल. पुढे राणीने सांगितले की हे सर्व कथेवर अवलंबून आहे. जर तिला तिसर्या चित्रपटासाठी एक उत्तम कथा मिळाली तर ती शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत परतण्यासाठी तयार आहे.