मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत नेहमी भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ बोलत असते. भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या इतर पक्षांना ते नेहमी सुनावत असते. त्यामुळे आगामी काळात किरण खेरची जागा कंगना घेईल असा अंदाज अनेकजण लावताना दिसतात. कंगना राजकीय क्षेत्रात उतरण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवार म्हणून चंदीगड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही माध्यामातून सुरू झाली होती. पण याबातमीचं स्वतः कंगनानंच खंडन केलंय.
या बातमीवर प्रतिक्रिया देताना कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या अफवांचे खंडन केलं. तिने एका हिंदी वृत्तवाहिनीचा फोटो पोस्ट केला ज्यामध्ये मथळा होता की, "चंदीगढवासियो मैं आ रही हू आपके शहर". कंगनाने स्पष्ट केलं की ही हेडलाइन तिचा कोट नाही आणि या सर्व केवळ अफवा आहेत.
दरम्यान, कंगनानं आपल्या राजकीय आकांक्षा कधीच लपवून ठेवलेल्या नाहीत. नोव्हेंबरमध्ये तिनं म्हटलं होतं की, भगवान कृष्णाचा आशीर्वाद मिळाल्यास ती पुढील लोकसभा निवडणूक लढवेन. ती अनेकदा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करत असते.