मुंबई - शाहरुख खानच्या आगामी जवान चित्रपटच्या ट्रेलरकडे आता बॉलिवूड प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहे. फिल्म ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत जवानचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार असल्याचे संकेत दिलेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या ट्रेलरवर सर्व नजरा रोखल्या आहेत. तुम्ही सज्ज आहात का? असे त्यांनी लिहिलंय.
शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ख्यातनाम दिग्दर्शक अॅटली कुमार यांनी केले आहे. निर्मितीची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची तमाम प्रेक्षक वाट पाहात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट आणि त्याच्या प्रमोशनल साहित्याबद्दल कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. काही दिवसापूर्वी शाहरुखने सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच दिसणार असल्याचे सांगितले होते.
मिळालेल्या माहितीनुसार जवानचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होईल. हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी जगभरात मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटासाठी प्रमोशनल स्ट्रॅटेजी अतिशय आक्रमकपणे आखली जाणार आहे. साधारण दोन महिने यासाठी प्रचार केला जाणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर, गाणी आणि वेगवेगळ्या शहरात कलाकारांसह प्रमोशन केले जाईल. यावेळी पहिल्यांदाच शाहरुख खान साऊथ विभागात अधिक वेळ देऊन प्रमोशन करताना दिसेल. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर जवानसाठी स्क्रिन्स मिळवले जातील. या चित्रपटाचा टीझर ७ किंवा १५ जुलै या पैकी एके दिवशी रिलीज होईल असे आधी सांगितले गेले होते. मात्र तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार ट्रेलरही लवकर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जवान चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च चेन्नईमध्ये होईल असे सांगितले जात आहे. यासाठी साऊथ आणि बॉलिवूडमधील दिग्गज सेलेब्रिटी पाहुणे म्हणून हजर राहतील असा अंदाज आहे.
जवान हा चित्रपट शाहरुख खानच्या पठाण नंतर २०२३ मधील सर्वात मोठे सिनेमॅटिक आकर्षण असणार आहे. या चित्रपटात शाहरूख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटद्वारे निर्मित जवानमध्ये तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती आणि लेडी सुपरस्टार नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत तर सान्या मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जवान या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिणेतील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शक अॅटली कुमारने केले आहे.