मुंबई :गेल्या काही दिवसांपासून 'रामायण' चित्रपटाची चर्चा सुरू आहे. नितेश तिवारीच्या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना राम आणि सीतेच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले होते. त्यानंतर हे दोघे एकत्र काम करण्याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, आता या चित्रपटात आलिया आणि रणबीर कपूरला एकत्र पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आलिया भट्टने या चित्रपटापासून स्वतःला आता दूर केले आहे. चित्रपट क्षेत्रातून मिळत असलेल्या माहितीनुसार आलिया तिच्या व्यग्र शेड्युलमुळे या प्रोजेक्टचा भाग होऊ शकणार नाही. या चित्रपटात आलिया सीतेची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू होती.
आलिया भट्ट रामायण चित्रपटात दिसणार नाही : आलियाच्या बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग सुरू होण्यास काही वेळ बाकी आहे. त्यामुळेच आलिया ही 'रामायण' चित्रपटाला वेळ देऊ शकणार नाही म्हणून तिने हा निर्णय घेतला आहे. आलियाने सर्व तारखा आधीच बुक केल्या आहेत आणि तिला तिच्या इतर प्रोजेक्टसाठी देखील वेळ काढावा लागणार आहे. यामुळे आलियाने व्यग्र शेड्यूल पाहता या चित्रपटापासून स्वत:ला वेगळे केले आहे. दरम्यान आलिया प्रोजेक्टमधून बाहेर पडली, हे अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत विधान समोर आलेलं नाही. सध्या चित्रपटाच्या कास्टवर दिग्दर्शकाचे लक्ष आहे.