मुंबई- रणवीर सिंग आणि आलिया भट्ट देशभर फिरुन 'रॉकी और रॉनी की प्रेम कहानी' चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी जंग जंग पछाडत असताना करण जोहरनेही अॅडव्हान्स बुकिंगची घोषणा केली आहे. करण जोहर या रोमँटिक चित्रपटाद्वारे सहा वर्षानंतर दिग्दर्शनात परतला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा एक महत्त्वकांक्षी चित्रपट आहे. 'रॉकी और रॉनी की प्रेम कहानी' सध्या ट्रेंडिंगमध्ये असून चित्रपटाच्या प्रमोशनला प्रेक्षक उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटातील 'तुम क्या मिले 'आणि 'व्हाट झुमका' या दोन गाण्यांना मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता 'धिंडोरा बाजे रे' हे नवे गाणे रिलीज झाले आहे.
'रॉकी और रॉनी की प्रेम कहानी' चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग गली बॉय चित्रपटानंतर दुसऱ्यांदा एकत्र येत आहेत. हा चित्रपट तब्बल २५०० स्क्रिन्सवर भारतात रिलीज केला जाणार आहे. परदेशात ३०० स्क्रिन्सवर 'रॉकी और रॉनी की प्रेम कहानी' झळकणार आहे. या चित्रपटाचे बजेट १७८ कोटी इतके आहे, त्यामुळे २०० कोटी कमाई होत नाही तोवर हा चित्रपट हिट समजला जाणार नाही. यासाठी निर्माता आणि कलाकारांची टीम रात्रंदिवस प्रमोशनमध्ये गुंतले आहेत.
करण जोहरला फिल्म इंडस्ट्रीमध्ये भरपूर शत्रू आहेत. या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळेल यासाठी त्याने सर्व प्रयत्न केले असावेत. चित्रपटाचे रिव्हयू सकारात्मक येणे आवश्यक आहे. चित्रपटाभोवती कोणताही वाद निर्माण न होता सर्व काही सुरळीत पार पडले तर बॉक्स ऑफिसचा दरवाजा सहज उघडला जाईल. नकारात्मक रिव्हयूमुळे निर्माते नुकसानीत जातात याचा अनुभव वारंवार पाहायला मिळाला आहे.
आलिया भट्ट आणि रणवीर सिंग हे दोघेही प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे कलाकार आहेत. शिवाय करण जोहरचा सिनेमाला मिळालेला रोमँटिक टच तरुण प्रेक्षकांना आकर्षित करु शकतो. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीस याठिकाणी साकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची सुरूवात चांगली झाली तर त्याचा लाभ पुढे अनेक दिवस होऊ शकतो.