मुंबई - Welcome to the Jungle Controversy: अक्षय कुमारचा चित्रपट 'वेलकम 3' हा सध्या खूप चर्चेत आला आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली होती. यासोबत या चित्रपटाच्या स्टारकास्टची ओळखदेखील करून देण्यात आली होती. दरम्यान आता 'वेलकम 3'वर अडचणीचे ढग दाटून आले आहेत. हे प्रकरण खूप गंभीर असल्यामुळे या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' (FWICE)नं 'वेलकम 3' चे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फिरोज यांनी कामगारांना पगार न दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
'वेलकम 3'ची शुटिंग बंद : फेडरेशननं अक्षय कुमार आणि दिशा पटानीसह 'वेलकम 3'च्या संपूर्ण स्टारकास्टला शूटिंग सुरू न करू देण्याचं आवाहन केलं आहे. अक्षय कुमारनं 9 सप्टेंबरला 'वेलकम 3' चा टीझर रिलीज केला. त्यानंतर काही दिवसांनी हा चित्रपट वादात सापडला. मीडिया रिपोर्टनुसार, फेडरेशननं फिरोज नाडियादवाला यांच्यावर 'वेलकम 2'ची थकबाकी असल्याचा आरोप केला आहे. फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, फिरोजनं यापूर्वी तंत्रज्ञांना 4 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं होतं, त्यानंतर त्यांना 2 कोटी रुपये दिले. त्यांना पूर्ण पैसे देण्यात आले नाही असा नाडियादवाला यांच्यावर आरोप आहे.