दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाचा सध्या एक ट्विट खूप चर्चेत आहे. आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी शासनाचे आदेश लागू झाल्यास लष्कर पीओके परत घेण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर रिचाने उपरोधाने गलवान हाय म्हणतोय, असे ट्विट केले होते. त्यानंतर रिचाला टीकेचा भडिमार सहन करावा लागला होता. सोशल मीडियावर जोरदार टीका झाल्यानंतर अभिनेत्रीला उघडपणे माफी मागावी लागली. आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही अभिनेत्रीच्या या आक्षेपार्ह ट्विटवर आक्षेप घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
रिचाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अक्षय कुमारने लिहिले की, 'हे पाहून दुःख झाले, कोणतीही गोष्ट आम्हाला आमच्या भारतीय सैन्याप्रती कृतघ्न (कृतज्ञता विसरणे) बनवू शकत नाही, ते तिथे आहेत म्हणून आम्ही आज इथे आहोत'.
रिचा चढ्ढाने ट्विटमध्ये लिहिले होते, 'गलवान म्हणतोय हाय." कमांडर लेफ्टनंट जनरलच्या विधानानंतर अभिनेत्रीने ही कमेंट केली होती. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. रिचा चड्ढाच्या गलवानवरील आक्षेपार्ह ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून युजर्स अभिनेत्रीच्या या ट्विटला शहीदांच्या अपमानाशी जोडत आहेत. अशा परिस्थितीत, प्रकरणाचे वाढते गांभीर्य पाहून अभिनेत्रीने माफी मागितली आणि 'माझा हेतू लष्कराचा अपमान करण्याचा नव्हता', असे म्हटले आहे.