कोरोना प्रहार कमी झाल्यानंतर प्रदर्शनासाठी तयार चित्रपटांमध्ये रिलीज होण्यासाठी थोडीफार स्पर्धा जाणवतेय. अनेक हिंदी चित्रपटांनी यावर्षीच्या २२ ऑक्टोबरपासून २०२२ च्या डिसेंबर पर्यंतच्या अनेक तारखा आपापल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी राखून ठेवल्यात. त्यामानाने मराठी चित्रपट निर्माते सबुरीचा भूमिका घेत असून आपसात स्पर्धा टाळताहेत. परंतु काही तयार असलेले मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालेले आहेत. ल्युमिनरी सिने वर्ल्ड निर्मित आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि. प्रस्तुत ''अजिंक्य'' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचे निर्माते अरुणकांत शुक्ला, नीरज आनंद, राघवेंद्र के. बाजपेयी, बाबालाल शेख, राहुल लोंढे आणि वेद पी. शर्मा हे असून उमेश नार्वेकर सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.
सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान तसेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्यावर चित्रित झालेला "अजिंक्य" गतवर्षी प्रदर्शनाच्या मार्गावर असताना कोरोनाने संपूर्ण जगावर संकट उभे केले. परंतु आता परिस्थिती पूर्ववत होत असल्या कारणाने महाराष्ट्र सरकारने चित्रपट प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. हॅशटॅग "अजिंक्य आला रे" असे म्हणत सोशल मीडियाद्वारे प्रदर्शन तारखेची घोषणा केली आणि पुन्हा एकदा "अजिंक्य" या सिनेमाची चर्चा होत असताना दिसत आहे. दिग्दर्शक अ. कदिर यांचा हा पहिलाच प्रयत्न असून सांगली जिल्ह्यातील जत या शहराचा तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्केटयार्ड या सर्व ठिकाणांचा त्यांनी सिनेमाच्या चित्रीकरणात उत्तम वापर करून घेतला आहे.
तरुणाईची नेमकी नस ओळखून ज्वलंत विषयावर भाष्य करणारा ‘अजिंक्य’ सिनेमा असून आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणाऱ्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नायकाच्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा आहे. अभिनेता भूषण प्रधान व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे दोघेही या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र आले आहेत. त्याप्रमाणेच जेष्ठ अभिनेते उदय टिकेकर, अरुण नलावडे, गणेश यादव, अनिकेत केळकर, प्रसाद जवादे, पद्मनाभ बिंब, त्रियुग मंत्री, अभिनेत्री वंदना वाकनीस आणि पल्लवी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अ. कदिर यांनी केलं आहे तसेच चित्रपटाची कथा, पटकथा, संवाददेखील अ. कदिर यांचेच आहेत.