मुंबई Ajay Devgn Injured :अजय देवगण आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटामुळं चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सेटवर अॅक्शन सीन शूट करताना तो जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याच्या चेहऱ्यावर अनेक जखमा असूनही त्यानं शूटिंग थांबू दिलं नाही आणि या जखमी अवस्थेतही तो शूटिंग करतच आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटाचं शूटिंग मुंबईतील विलेपार्ले येथे सुरू आहे. अजय चित्रपटामधील शूटिंग सेटवर अॅक्शन सीन शूट करत आहे. हे सीन शूट करत असताना त्याला डोळ्याजवळ दुखापत झाली आहे.
अजय देवगणला झाली दुखापत :अजयनं शूटिंगमधून ब्रेक घेतला आणि वैद्यकीय मदत घेतली. अजयच्या अनुपस्थितीत काही काळ शूटिंग थांबवण्यात आलं होतं. अजयनं वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर लगेचच शूटिंग पुन्हा सुरू केलं. 'सिंघम', 'सिंघम रिटर्न्स', 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' या चित्रपटांनंतर सिंघम अगेन हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. आधी या चित्रपटांनी रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई केली आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण आणि करीना कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'सिंघम अगेन'च्या शूटिंगचं पहिलं शेड्यूल हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये झालं. रामोजी फिल्ममध्ये या चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन शूट करण्यात आला.