मुंबई - सुपरस्टार प्रभासची प्रतिमा आता जगभर उंचावली आहे. त्याच्या प्रोजेक्ट के चित्रपटाची पहिली झलक सॅन दिएगो कॉमिक कॉन इव्हेन्टमध्ये लॉन्च केली जाणार आहे. हा एक आंतरराष्ट्री इव्हेन्ट असेल आणि यात पहिल्यांदाच भारतीय चित्रपटाचे प्रमोशन केले जाणार आहे. यामुळे प्रभासच्या अमेरिकेतील चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट आली आहे.
अमेरिकेतील सेंट लुइस मिस्सोरी येथील प्रभासच्या चाहत्यांनी प्रोजेक्ट केच्या इव्हेनच्या प्रमोशनसाठी एक अनोखी शक्कल लढवली होती. त्यांनी प्रोजेक्ट के च्या सॅन दिएगो कॉमिक कॉन इव्हेन्टसाठी खास कार रॅलीचे आयोजन केले होते. प्रभासच्या डाय हार्ड फॅन्सनी यासाठी पुढाकार घेतला आणि एक चित्ताकर्षक रॅलीसह प्रभासचे जगभर चाहते कशा पद्धतीने समर्थन करत असतात याची झलक दाखवून दिली.
वैजयंती मुव्हीजने युट्यूबवर हा आकर्षक कार रॅलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रभासच्या चाहत्यांनी या कार रॅलीचे देखणे व शिस्तबद्ध आयोजन केले होते. चाहत्यांच्या या कृतीचे कौतुक करत निर्मात्यांनी लिहिलंय की, 'रिबेल स्टार प्रभासच्या चाहत्यांची मोठी गर्जना. अमेरिकेतील सेंट लुइस मिस्सोरी येथील प्रभासच्या चाहत्यांची प्रोजेक्ट केसाठी कार रॅली. या चित्रपटाची पहिली झलक २१ जुलै रोजी भारतात पाहायला मिळणार आहे.'
कार रॅलीत सहभागी झालेल्या चाहत्यांनी प्रोजेक्ट केच्या प्रेमोशन इव्हेन्टपूर्वी अनोख्या प्रकारे आनंद उत्सव साजरा केला. या चित्रपटाची पहिली जलक २० जुलै रोजी अमेरिकेत व २१ जुलै रोजी भारतात दिसेल. या चित्रपटात काम करत असलेल्या दीपिका पदुकोणच्या पात्राबद्दलचीही उत्सुकता खूप ताणली आहे. नुकताच या चित्रपटातील दीपिकाची पहिली झलक निर्मात्यांनी दाखवली आहे. परंतु तिची व्यक्तीरेखा आणि कथानक याबद्दलचा तपशील अजूनही गुलदस्त्यात आहे. या इव्हेन्टसाठी प्राभाससह दीपिका पदुकोण सॅन दिएगो येथे हजर राहणार आहे. कमल हासन यांचीही त्यात महत्त्वाची भूमिका असून तेही या इव्हेन्टला खास हजर राहतील. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची ही भूमिका असून तब्बल ६०० कोटी रुपये बजेट असलेला हा सर्वात मोठा भारतीय चित्रपट असेल.