मुंबई- मराठीतील प्रतिभावान अभिनेता भरत जाधव नव्या नाटकासह मायबाप नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. 'अस्तित्व' या नव्या नाटकातून तो पुन्हा रंगमंचावर अवतरणार आहे. गेली उणीपुरी ३० वर्षे मनोरंजनाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या भरत जाधवच्या 'सही रे सही' नाटकाला २१ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी रंगभूमीवर इतिहास रचणाऱ्या या 'रेकॉर्डब्रेक' नाटकाचे प्रयोग आजही जोमात सुरु असतानाच भरतने 'अस्तित्व' या नव्या नाटकाची घोषणा स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून केली आहे. आतापर्यंत केली नाही अशी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा आपण या नाटकात साकारणार असल्याचा दावा भरत जाधवने केला आहे. लेखक-दिग्दर्शक स्वप्निल जाधवच्या प्रतिभेवरही भरतने विश्वास व्यक्त केला आहे.
शून्यापासून शिखरापर्यंतचा प्रवास :भरत जाधव हा गिरणगावाचे 'प्रॉडक्ट' आहे. मुंबईतल्या परळ भागातल्या कामगारवस्तीत भरत लहानाचा मोठा झाला. त्याची जडणघडणही तिथेच झाली. भरतचा कलाप्रवास दिवंगत शाहीर साबळे यांच्या 'महाराष्ट्राची लोकधारा' या लोककलाप्रकारातून झाला. अभिनय, नृत्याचे बाळकडू तिथेच मिळाले. त्यानंतर आमच्या सारखे आम्हीच, सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, आमच्यासारखे आम्हीच, सौजन्याची ऐशी तैशी, पुन्हा सही रे सही, मोरुची मावशी, तू तू मी मी सारख्या नाटकांमधून तो नावारुपाला आला. भरत जाधव म्हणजे नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीवर हमखास 'हाऊसफुल्ल' च्या पाटीची शाश्वती, हे गृहितकही दृढ होत गेले. रामोजी राव यांची निर्मिती असलेला 'चालू नवरा, भोळी बायको' या चित्रपटातून त्याचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. त्यानंतर त्याच्या यशाचा वारु मराठी चित्रपटसृष्टीत उधळतच राहिला. मराठी चित्रपटांचा 'सुपरस्टार' झाल्यानंतरही त्याने नाटकांशी नाळ मात्र तोडली नाही. भरत जाधव हा इतर काही 'फिल्मस्टार्स' सारखा सतत ग्लॅमरच्या दुनियेत रमणारा नाही. आपले काम भले आणि आपण भले असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे 'स्टार स्टडेट' पार्ट्यांमध्येही त्याचा वावर कमी असतो. मुंबईतल्या चकचकीत विश्वातून त्याने स्वतःला मुक्त केले असून तो आपल्या मूळ गावी कोल्हापूरात सध्या मुक्कामाला आहे.
नाटक हेच पहिले प्रेम :विनोदी अभिनेता म्हणून ओळख निर्माण झालेल्या भरतने नाटकांमधून काही गंभीर व्यक्तिरेखांनाही न्याय दिला. 'अधांतर', 'जन्मसिद्ध'मधल्या भूमिका साकारत आपण गंभीर व्यक्तिरेखांनाही न्याय देऊ शकतो, याची चुणूक त्याने दाखवली. विविधांगी व्यक्तिरेखा साकारण्याची कलात्मक भूक शमवण्याच्या उद्देशानेच त्याने 'अस्तित्व'ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता म्हणून त्याने याआधीही 'सही रे सही' (आणि 'पुन्हा सही रे सही') मध्ये चौरंगी भूमिका करण्याचे, 'मोरुची मावशी' मधली विजय चव्हाण यांनी अक्षरशः जिवंत करणारी शीर्षक भूमिकांचे आव्हान भरतने आधीही पेलवले आहे. 'अस्तित्व' च्या निमित्ताने त्याच्यातल्या सुप्त, परिपक्व कलाकाराला अधिक वाव मिळणार आहे.
नाटकासाठी ताकदीची टीम :लेखक-दिग्दर्शक स्वप्निल जाधव आणि अभिनेता भरत जाधव यांना या नाटकात तोलामोलाची साथ लाभणार आहे ती चिन्मयी सुमीत या गुणी अभिनेत्रीची. चिन्मयीने याआधी अनेक नाटकं, दूरचित्रवाहिन्यांमधील भूमिकांमधून स्वतःचे अभिनयसामर्थ्य दाखवून दिले आहे. नाटक, चित्रपट, जाहिरातविश्वात ज्यांना गुरुचे स्थान अनेक मातब्बरांनी दिले अशा दिवंगत विनय आपटे यांच्या दिग्दर्शनाखाली 'कथा अरुणाची' या नाटकात चिन्मयीने साकारलेली अरुणा शानबाग आजही विसरता येत नाही. एकूण 'अस्तित्व' या नाटकात उत्तम रंगकर्मींची भट्टी जमून आली आहे.