मुंबई - शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा अॅक्शन पॅक्ड ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. यातील किंग खानचा लूक पाहून प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत. 'जवान'च्या प्रत्येक पोस्टरनंतर चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढत गेली आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज केले जाणार असून त्याबद्दलचीही जबरदस्त प्रतीक्षा चाहते करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार 'जवान'च्या निर्मात्यांनी पहिले गाणे रिलीज करण्याची तयारी पूर्ण केली आहे. या गाण्याचे शीर्षक 'जिंदा बंदा' असे असणार असून हे एक चटपटीत गाणे असणार आहे. हे गाणे शाहरुख खानवर भव्य प्रमाणात शूट करण्यात आल्याचे सांगितले जाते.
या गाण्यातील दृष्यांची भव्यता प्रेक्षकांना रोमांचित करेल, असा विश्वास निर्मात्यांना वाटतो. त्याच वेळी 'जिंदा बंदा' हे गाणे लोकप्रिय होईल याचे कारण म्हणजे या गाण्याला ख्यातनाम संगीतकार अनिरुद्ध रविंचदर यांनी दिलेले संगीत. विशेष बाब म्हणजे अनिरुद्ध रविंचंदर यांचे हे पहिलेच हिंदी गाणे असणार आहे. या चित्रपटातून ते बॉलिवूडमध्ये पदार्पण करतील.
'जिंदा बंदा' गाण्याच्या रिलीजची तारीख अद्याप जाहीर केलेली नसली तरी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे गाणे रिलीज होऊ शकते, असा अंदाज आहे. ट्रेलरमध्येही काही बदल केले जाऊ शकतात पण रिलीज पूर्वी त्याचे प्रदर्शन होईल. 'जवान' हा चित्रपट शाहरुख खानच्या 'पठाण' नंतरचा चित्रपट आहे. 'पठाण'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती आणि अनेक विक्रम मोडीत काढले होते. हिंदी चित्रपटसृष्टील हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.
रोमँटिक दृष्यासाठी ओळखला जाणारा शाहरुख खानने आता आपला मोर्चा अॅक्शन चित्रपटाकडे वळवला आहे. 'पठाण' चित्रपटातून हे मोठ्या प्रमाणावर दाखवण्यात आले. याच धर्तीवर 'जवान' चित्रपटात तो नेत्रदीपक अॅक्शन करताना दिसणार आहे. जवानमध्ये सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, दीपिका पदुकोण आणि सुनिल ग्रोव्हर यंच्या भूमिका आहेत.