नवी दिल्ली- अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची बुधवारी आठ तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) गुरूवारी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीला चौकशीसाठी 11 वाजता बोलवले आहे. हे प्रकरण 200 कोटी रुपयांच्या सुकेश चंद्रशेखरने केलेल्या खंडणी व फसवणुकीशी संबंधित आहे, करोडपती ठग सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. नोराची यापूर्वी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात याच प्रकरणात ईओडब्ल्यूने चौकशी केली होती.
बुधवारी सकाळी 11 वाजता जॅकलिन ईओडब्ल्यू कार्यालयात पोहोचली आणि रात्री 8 वाजेपर्यंत तिची चौकशी सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नोराची चौकशी केल्यानंतर जॅकलिनला पुन्हा कधी बोलावायचे याचा निर्णय पोलिस घेतील. बुधवारी या प्रकरणातील आणखी एक आरोपी पिंकी इराणी हिच्याशी जॅकलिनचा सामना झाला.