मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या केदारनाथमधून पदार्पण केल्यानंतर प्रथमच ती स्वतःच्या खांद्यावर संपूर्ण चित्रपटाचा भार सांभाळण्यासाठी सज्ज झाली आहे. सारा आगामी ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जोहरने बनवलेल्या या चित्रपटात सारा स्वातंत्र्य चळवळीत गुप्त रोडिओ चालवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
सोमवारी निर्मात्यांनी ए वतन मेरे वतनचा टीझर शेअर केला. या चित्रपटात सारा तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच खऱ्या आयुष्यातील नायिकेची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी सारा अली खानने सिम्बा, कुली नंबर 1 आणि अतरंगी रे सारख्या व्यावसायिक चित्रपटात काम करुन चाहत्यांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. उषा मेहता बायोपिकमध्येही साराच्या गंभीर भूमिका साकारण्याच्या क्षमतेची चाचणी घेतली जाणार आहे.
कसा आहे ए मेरे वतनचा टीझर- ए मेरे वतन चित्रपटाच्या टीझरमध्ये उषा मेहतांच्या भूमिकेत असलेली सारा अली खान घराचे दरवाजा, खिडक्या बंद करते व घाईने रेडिओ प्रसारणाची तयारी करताना दिसते. अखेर थेट प्रसारण सुरू होते. रेडिओ अनाऊन्समेंटमध्ये सारा हिंदीमध्ये म्हणते की, 'इंग्रजांना वाटतंय की त्यांनी चले जाओ आंदोलनाचे डोके दडपून टाकले आहे. परंतु स्वतंत्र आवाज कधीच कैद होत नसते. हा हिंदुस्थानचा आवाज, हिंदुस्थानमधून कुठुनतरी, कुठूनतरी हिंदुस्थानमधून.' हे बोलत असतानाच बाहेरुन दरवाजा जोरजोरात ठोठावला जातो. उषा मेहतांच्या भूमिकेतील सारा अलीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. आपल्याला लक्षात येते की बाहर पोलीस मेहतांना पकडण्यासाठी आले असावेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा टीझर स्वातंत्र्य चळवळीतील एक अज्ञात यशोगाथा प्रेक्षकांसमोर मांडताना दिसतो.