मुंबई - सुपरस्टार प्रभासने प्रभू रामचंद्राची भूमिका साकारलेला 'आदिपुरुष' चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करु न शकलेला हा चित्रपट अनेक वाद विवादांचे केद्र बनला होता. आता पुन्हा एकदा या चित्रपटाचे डिजीटल रिलीज होणार असल्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष 'आदिपुरुष'कडे वळले आहे.
खराब व्हिज्युअल इफेक्ट्स आणि संवाद यामुळे टीकेचा धनी बनलेल्या या चित्रपटाची प्रतीक्षा प्रभासचे चाहते करत होते. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या डिजिटल प्रसारणाची घोषणा पूर्वसूचनेशिवाय झाल्यामुळे त्याच्या समर्थकांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली आहे.
'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्यांनी अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स या दोन्हीं ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत डिजिटल वितरण हक्क सुरक्षित केले आहेत. यामुळे या पॅन इंडिया चित्रपटाला व्यापक प्रेक्षक वर्ग लाभणार आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही बातमी दिल्याने ही बातमी खरी असल्यावर शिक्का मोर्तब झाले आहे. हा चित्रपट मल्याळम, तेलुगु, तमिळ आणि कन्नड भाषेमध्ये अमेझॉन प्राईम व्हिडिओवर दिसणार असून हिंदी आवृत्ती नेटफ्लिक्सवर पाहाता येणार आहे.
सुमारे ७०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला 'आदिपुरुष' हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जातो. दिग्दर्शक ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट त्याची पटकथा, संवाद लेखन, पात्र चित्रण आणि व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये जाणवलेल्या त्रुटींमुळे प्रेक्षक आणि समीक्षकांनी चित्रपटाच्या निर्मितीवर भरपूर टीका केली होती. चित्रपटाची कथा, यातून निघालेला कथित चुकीचा अर्थ, हनुमानाची तोंडी असलेले संवाद आणि इतर अनेक गोष्टींमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.