मुंबई- आदिपुरुष या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी नुकत्याच तिरुपती बालाजी मंदिराच्या भेटीदरम्यान बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या गालाचे चुंबन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या टीमने तिरुपती येथे प्री रिलीजचा भव्य सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रभाससह चित्रपटाच्या टीमने बालाजी मंदिराला भेट दिली होती. याच दरम्यान वरील प्रसंग घडल्याचे सांगितले जाते.
अलिकडेच व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिग्दर्शक ओम राऊत आदिपुरुष चित्रपटात सीतेची भूमिका करणार्या क्रितीला तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात चुंबन घेताना दिसत आहे, ज्यामुळे नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी हे निंदनीय कृत्य असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितले की, पती-पत्नी देखील एकत्र मंदिरात जात नाहीत. असले उद्योग दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांनी हॉटेलच्या खोलीत जाऊन करु शकतात, मंदिरात नाही.
आंध्र प्रदेशातील भाजपचे प्रदेश सचिव रमेश नायडू नागोथू यांनीही आता हटवलेल्या ट्विटमध्ये अशीच टीका केली आहे. 'अशा पवित्र ठिकाणी असे वागणे योग्य आहे का? तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासमोर चुंबन घेणे आणि मिठी मारणे यासारख्या गोष्टी करणे अनादरकारक आणि अस्वीकार्य मानले.'