मुंबई- खूप काळ सुरू असलेली प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा अखेर संपली. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपट आज 2D आणि 3D मध्ये देशभरातील थिएटरमध्ये झळकला आहे. पहिल्या दिवशी पहिला शो पाहणाऱ्या चाहत्यांनी थिएटर बाहेर अलोट गर्दी केल्याचे वेगवेगळ्या शहरात चित्र दिसत होते. या चित्रपटाला मिळाले अॅडव्हान्स बुकिंगही आधीचे विक्रम मोडीत काढणारे ठरले आहे.
ओम राऊत लिखित आणि दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट प्राचीन संस्कृत महाकाव्य रामायणचे मोठ्या पडद्यावरील रूपांतर आहे. हा सिनेमा ५०० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलाय. आदिपुरुष चित्रपट भारतात ७००० आणि परदेशात ३००० असा जगभरात १० हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आलाय. प्रभास, क्रिती सेनॉन, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करत आहे.
एका न्यूजवायरला दिलेल्या मुलाखतीत पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचे सह-सीईओ गौतम दत्ता यांनी आदिपुरुषसाठी ८० ते ८५ कोटी रुपयांचा ओपनिंग डे भाकीत केला आहे. दत्ता यांच्या मते, पहिल्या वीकेंडच्या शेवटी हा चित्रपट २०० कोटींहून अधिक कमाई करेल. सुरुवातीच्या अहवालांवरून असे सूचित होतंय की चित्रपट पाहणाऱ्यांचा प्रतिसाद अफाट आहे. पौराणिक नाटक संस्था, अनेक सेलिब्रिटी, राजकीय पक्ष, शाळा आणि एनजीओ यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आगाऊ बुकिंग केले जात आहे.
मल्टिप्लेक्स तसेच सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये चित्रपटासाठी अभूतपूर्व आगाऊ बुकिंग होत असल्यामुळे चित्रपट व्यवसायातील तज्ञांच्या मते याची तुलना अलिकडे रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या पठाणत्या कमाईशी केली जात आहे. प्रभासचे बाहुबली चित्रपटानंतर आलेले साहो आणि राधे श्याम हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करु शकले नव्हते. प्रभासचा हा चित्रपट पुन्हा बॉक्स ऑफिसवर तडाखेबंद कमाई निश्चित करेल असा विश्वा ट्रेड पंडितांना वाटतोय.