मुंबई - मालेगांव फिल्म इंडस्ट्री हा एक अफलातून चित्रपटउद्योग आहे. अत्यंत कमी खर्चात स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ एकत्र येऊन चित्रपटांची निर्मिती करतात आणि त्याचे प्रदर्शनही करतात. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. उदाहरणदाखल सांगायचे तर 'मालेगांव के शोले', 'मालेगांव का क्रिश', 'मालेगांव का गजनी' अशा शीर्षकांची चित्रपट निर्मिती इथे होते. आता बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील नामवंत लेखिका आणि निर्माती रीमा कागती यांनी आगामी 'सुपरमॅन ऑफ मालेगांव' या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. या चित्रपटात 'बाफ्टा'मध्ये नामांकन मिळालेला अभिनेता आदर्श गौरव मुख्य भूमिका साकारणार आहे. हा एक धमाल विनोदी चित्रपट असणार आहे.
याबद्दल बोलताना आदर्श म्हणाला, "जेव्हा मला रीमा कागती यांनी मालेगावबद्दल सांगितले तेव्हा आपल्याला होय म्हणायचे आहे, हे मी जाणून होतो. यापूर्वी मी मालेगांव फिल्म इंडस्ट्रीबद्दल ऐकले होते आणि ते कसे कमी खर्चात सिनेमांची निर्मिती करतात ही गोष्ट खूप रंजक वाटली होती."
"ते एक वेगळेच जग आहे. ही एक मोठी कमी लेखली गेेलेली फिल्म इंडस्ट्री आहे, ज्याचे चित्रपट मजेशीर असतात आणि १०० टक्के खात्रीपूर्वक कमाई करुन देतात. या फिल्म इंडस्ट्रीला प्रकाशात आणण्याची हीच योग्य वेळ आहे," असेही गौरव पुढे म्हणाला.
अभिनेता आदर्श गौरव 'गन्स अँड गुलाब' या राज आणि डीके दिग्दर्शित वेब सिरीजमध्येही काम करत आहे. ९० च्या दशकातील गुन्हेगारीवर आधारित ही मालिका आहे. या मालिकेत राजकुमार राव, गुलशन देवय्या, दुल्कर सलमान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असतील.