महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'ब्लॅक अँड व्हाईट'चा जमाना रंगीन बनवणारी अभिनेत्री रंजना देशमुखचा बायोपिक, "रंजना - अनफोल्ड"!

आपल्या चौफेर अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. चतुरस्र अभिनेत्री असणाऱ्या रंजना यांचा जीवनप्रवास चित्रपट रूपात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

रंजना - अनफोल्ड
रंजना - अनफोल्ड

By

Published : Jul 25, 2022, 4:07 PM IST

मुंबई - सध्या बायोपिक्सचा जमाना आहे. अनेक फेमस व्यक्तींचे जीवनविशेष दर्शविणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच पाठिंबा दिलाय. भाई (पु ल देशपांडे), बालगंधर्व (बालगंधर्व), ठाकरे (बाळासाहेब ठाकरे), धर्मवीर (आनंद दिघे), मी वसंतराव (वसंतराव देशपांडे) सारखे अनेक जीवनपट प्रेक्षकांना आवडले. आता अजून एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय जो एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या जीवनावर बेतला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयानं रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. आपल्या चौफेर अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करताना अभिनेत्यांसोबत जोड्या जुळवत त्यांनी बरेच सिनेमे गाजवले. अशा चतुरस्र अभिनेत्री असणाऱ्या रंजना यांचा जीवनप्रवास चित्रपट रूपात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

मुंबईतच जन्मलेल्या रंजना यांनी १९६० ते २००० पर्यंत विविध व्यक्तिरेखा साकारत मराठी रसिकांचं मनोरंजन केलं. वयाच्या पाचव्या वर्षीच 'हरिश्चंद्र तारामती' या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून काम करत त्या सिनेसृष्टीत दाखल झाल्या. तरुणपणी 'असला नवरा नको गं बाई' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्यांनी कौतुकाची थाप मिळवली. त्यानंतर 'मुंबईचा फौजदार', 'सुशीला', 'गोंधळात गोंधळ', 'गुपचुप गुपचुप', 'बहुरूपी', 'बिन कामाचा नवरा', 'खिचडी' अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत त्यांनी आपल्या कलागुणांचं दर्शन घडवलं. आता पुन्हा एकदा त्या बायोपीकच्या रूपात मराठी रसिकांसमोर येणार आहेत.

रंजना - अनफोल्ड

रंजना यांच्या जीवनावर आधारलेल्या 'रंजना - अनफोल्ड' या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. डॅा. श्रीकांत भासी, चेअरमन - कार्निव्हल ग्रुप हे या चित्रपटाची प्रस्तुती करणार असून कार्निव्हल मोशन पिक्चर्स आणि वैशाली सरवणकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'रंजना - अनफोल्ड' या चित्रपटाद्वारे रंजना देशमुख यांचा जीवन प्रवास उलगडण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग हे या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करणार आहेत.

कार्निवल मोशन पिक्चर्स हे डॉ. श्रीकांत भासी यांचे एक अग्रगण्य प्रॉडक्शन स्टुडिओपैकी एक असून आजपर्यंत अनेक उल्लेखनीय बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे, ज्यामध्ये 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' - क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरवर आधारित हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषांमधील चित्रपट, शिवसेना प्रमख बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा हिंदी आणि मराठी चित्रपट केले असून 'मेरे देश की धरती', 'ब्लँक' आणि 'वार छोड ना यार' या बॉलीवूड चित्रपटांचादेखील त्यात समावेश आहे. 'सेकंड शो" या मल्याळम चित्रपटातुन कार्निवल मोशन पिक्चर्सने मल्याळम सुपरस्टार दुलकर सलमानला लाँच केले. 'व्हायोलिन', 'मॅटिनी', 'हँगओव्हर', 'आदि कप्यारे कूटमणी', 'मुधुगव', एडक्कड बटालियन 06' या प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती केली असून आता मराठीतील पहिल्यावहिल्या "रंजना....अनफोल्ड" हा चित्रपट घेऊन येण्यास सज्ज होत आहेत.

लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करून पुढल्या वर्षी ३ मार्च २०२३ रोजी 'रंजना - अनफोल्ड' रसिकांसमोर सादर करण्याची योजना आखण्यात आली आहे. रंजनाच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची निवड केली जाणार हे पाहणे औत्सुक्याचे टरणार आहे.

हेही वाचा -विजय सेतुपतीसोबत 'मेरी ख्रिसमस'ची रिहर्सल करताना कॅटरिना म्हणाली, 'वर्क इन प्रोग्रेस'

ABOUT THE AUTHOR

...view details