मुंबई - corruption charges against CBFC : तामिळ अभिनेता आणि निर्माता विशालचा 'मार्क अँटनी' हा तमिळ चित्रपट अलीकडेच रिलीज झाला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी त्याने केंद्रीय सेन्सॉर बोर्डाच्या मुंबईतील कार्यालयात अर्ज केला होता. मात्र या प्रमाणपत्रासाठी तिथल्या अधिकाऱ्यांनी साडे सहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप विशालनं केला आहे. यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी याला याबद्दल विचारण्यात आलं असता या प्रकारच्या अनुभव सेन्सॉर बोर्डाकडून यापूर्वी कधीच आला नसल्याचं त्यानं सांगितलं. अशा प्रकारचं काही घडतं, हे कधी ऐकण्यातही आलं नसल्याचं तो म्हणाला. त्यामुळं यावर प्रतिक्रिया देण्यास त्यानं नकार दिला.
दरम्यान या प्रकरणी अभिनेता विशालनं सेन्सॉर बोर्डवर केलेल्या आरोपांवर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता अशोक पंडित म्हणतात, '... त्याने आपल्या वक्तव्यात दोन नावं घेतली आहेत, एम राजन आणि जिजा रामदास. माझ्या माहितीनुसार हे दोघेही केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे कर्मचारी नाहीत. .. त्यामुळे या टप्प्यावर सीबीएफसी अधिकाऱ्यावर आरोप करणं योग्य नाही... पण जर आरोप होत असतील तर आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करतो कारण हे आरोप खूप गंभीर आहेत...लाच मागणारा अधिकारी त्याच्या थेट खात्यात पैसे घेणार हे उघड आहे. विशालनं नाव दिलेल्या या दोन लोकांना विचारले पाहिजे की त्यांनी CBFC मधून कोणाच्या तरी वतीने पैसे घेतले आहेत का... या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी झाली पाहीजे.'
अभिनेता विशानं सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यावर आरोप केल्यानंतर चित्रपट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रेक्षक आणि सिने क्षेत्रातील अनेकजण विशालचं समर्थन करताना दिसताहेत. अभिनेता विशालने एका व्हिडिओच्या माध्यमातून आपले निवेदन केले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. हा स्कॅम प्रकार केंद्रीय सेन्सॉर बोर्ड, मुंबईत घडल्याचं त्यानं सांगितलंय.
अभिनेता विशालचा सेन्सॉर बोर्डातील अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याचा आरोप - सोशल मीडियावर विशालनं एक व्हिडिओ शेअर करत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केलेयत. तो म्हणाला, 'फिल्मच्या सर्टिफिकेशनसाठी आम्ही ऑनलाईन अप्लाय केलं होतं. त्यांनी साडे सहा लाखाची लाच मागितली. पहिल्यांदा तीन लाख सिनेमा पाहण्यासाठी त्यांना द्यायचे होते आणि बाकीचे साडे तीन लाख सर्टिफिकेटच्यावेळी देण्याची त्यांची मागणी होती. सर्टिफिकेट मिळवणं माझ्यासाठी महत्त्वाचं असल्यामुळे मी ठरल्याप्रमाणे पैसे चुकते केले आणि प्रमाणपत्र मिळवून चित्रपट रिलीज झाला. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचं मला वाटतं. आपले पंतप्रधान नेहमी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत असतात, सर्वच राजकारणीही याबद्दल बोलतात, तेव्हा हे एक भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे, माझ्यासारख्याकडं जर लाच मागितली जात असेल तर इतर निर्मात्यांकडून ते कसे उकळत असतील, याचा विचार व्हावा. आमच्याकडं याबद्दलचे पुरावे आहेत आणि आम्ही मुंबईच्या सीबीएफसी कार्यालयात कसा भ्रष्टाचार चालतो हे उघड करु शकतो. या प्रकरणी कारवाई होईल अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद', असे म्हणत विशालनं या व्हिडिओचा शेवट केलाय.