मुंबई :बॉलीवूड अभिनेता सनी देओलने मंगळवारी 'बँक ऑफ बडोदा'च्या मालमत्तेच्या लिलावाच्या सूचनेवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. 'बँक ऑफ बडोदा' ५६ कोटी रुपये वसूल करण्यासाठी भाजपा खासदार सनी देओलच्या मालमत्तेचा लिलाव करण्याच्या तयारीत होते. दरम्यान आता सनी देओल असे म्हटले की, 'मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. या वैयक्तिक बाबी आहेत. मी काहीही बोललो तरी लोक चुकीचा अर्थ काढतील', असे त्याने सांगितले. दरम्यान, 'बँक ऑफ बडोदा'ने सनी देओलच्या मुंबईतील मालमत्तेच्या लिलावाची नोटीस का मागे घेतली यासाठी दोन प्रमुख 'तांत्रिक' कारणे नमूद केली आहेत.
सनी देओलवर ५६ कोटी कर्ज : बँकेने जारी केलेल्या नोटीसनुसार, सनी देओलवर कर्जाचे जवळपास ५६ कोटी रुपये शिल्लक आहेत. परंतु बँकेनं बंगल्याची राखीव किंमत ५१.४३ कोटी रुपये निश्चित केली होती. सनी देओलने थकबाकी भरण्यासाठी संपर्क साधल्याचेही बँकेचे म्हणणे होते. याशिवाय बँकेने नोटीस मागे घेण्यामागे दोन तांत्रिक कारणेही दिली आहेत. बँकेच्या वतीने सांगण्यात आले की, पहिले कारण म्हणजे सनी देओलकडून एकूण किती रक्कम वसूल करायची आहे, याचा उल्लेख एकूण थकबाकीमध्ये नव्हता. त्यानंतर बँकेने निदर्शनास आणलेली दुसरी चूक अशी होती की, विक्रीची नोटीस सुरक्षा व्याज नियम, २००२ च्या नियम ८ (६) नुसार मालमत्तेच्या प्रतीकात्मक ताब्यावर आधारित आहे.