मुंबई- हल्ली प्रेक्षकांच्या अभिरुचीत खूप बदल झाला असून त्यांना चित्रपटांत चांगले विषय मांडलेले हवे आहेत. कोरोना काळात मनोरंजनासाठी जवळपास सर्वचजण ओटीटीकडे वळले होते. त्यातही आजचा तरुण वर्ग जागतिक कन्टेन्ट च्या प्रेमात असल्यामुळे आपल्या चित्रपटांतून होणारी विषयांची सामान्यता आणि तोचतोचपणा तो टाळताना दिसतो आणि अर्थातच त्यामुळे चित्रपटगृहांत चित्रपट चालत नाहीयेत. त्यांना विषयांत खरेपण हवं आहे आणि त्यामुळेच कदाचित सध्या बायोपिक्स ना डिमांड आहे. आधीचे बरेच बायोपिक्स प्रेक्षकांनी पसंद केले त्यामुळे त्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्लाही जमविला. सध्या बरेच बायोपिक्स निर्माणाधीन आहेत आणि त्यातीलच एक म्हणजे भारतासाठी शूटिंगमध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळविणारा अभिनव बिंद्राचा बायोपिक. त्याला पद्मभूषणने सुद्धा सन्मानित केले गेले आहे. यात अनिल कपूर सुपुत्र हर्षवर्धन कपूर शीर्षक भूमिकेत आहे.
ऑलिम्पिक वीर अभिनव बिंद्रा- २००८ साली समर ऑलिम्पिक मध्ये अभिनव बिंद्राने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल इव्हेंट मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. ते भारताचे पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक होते. त्यावर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत बिंद्राने सात पदकं मिळविली होती. त्याच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत अभिनवने तब्बल १५० पदके मिळविली आहेत. अश्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर चित्रपट बनत असून अभिनव बिंद्राची भूमिका हर्षवर्धन कपूर साकारत आहे. त्यासाठी हर्षवर्धन जय्यत तयारी करीत असून त्याने शूटिंग क्लासेस लावले आहेत आणि त्यात त्याची प्रगती कौतुकास्पद आहे असे त्याचे ट्रेनर म्हणतात. हर्षवर्धन कपूर याआधी ‘थार’ या वेब फिल्म मध्ये दिसला होता ज्यात अनिल कपूर सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत होता. या फिल्म ने अनेक पुरस्कार पटकावले ज्यात आंतरराष्ट्रीय अवॉर्डचा सुद्धा समावेश आहे. हर्षवर्धन पहिल्यांदाच एका बायोपिकचा हिस्सा बनलाय त्यामुळे तो कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाहीये. अभिनव बिंद्राच्या बायोपिकसाठी हर्षवर्धन बरीच मेहनत घेत असून तो समाज माध्यमांवर त्याच्या शूटिंग चे काही क्षण शेअर करीत असतो. त्याच्यामते ही भूमिका साकारताना तो छोट्या छोट्या स्टेप्स घेतोय.