कोल्हापूर : 300 हुन अधिक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापुरातल्या कळंबा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी सहा वाजता त्यांचे निधन झाले असून आज येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुलकर्णी यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. गेली ५० वर्षे रुपेरी पडद्यावर वावरणारे कुलकर्णी सर हे कोल्हापूरातील चित्रकर्मींमध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते. वृध्दापकाळातही ते कोल्हापूरात जयप्रभा स्टुडिओसाठी सुरू असलेल्या आंदोलनात मार्दर्शक होते. त्यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
भालचंद्र कुलकर्णी गेल्या कही दिवसापासून आजारी होते. वयानुसार होणाऱ्या शारिरीक तक्रारी सुरू असताना अल्प आजाराने त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरातील कळंबा परिसरातील शिवप्रभू नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून त्यांची साडे अकरा वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कोल्हापूरातील चित्रपट क्षेत्रातील मंडळी त्यांच्या दर्शनासाठी पोहोचली आहेत.