मुंबई :ट्रेलरमध्ये अभिनय बेर्डे एका साध्या सरळ मुलाच्या भूमिकेत दिसत आहे. तो प्रेमभंगाच्या काळात प्रत्येक मुलीला रडायला खांदा देत असतो. प्रत्येक मुलगी त्याला 'त्या' नजरेने कधी बघत नाही. खऱ्या प्रेमाच्या शोधात असतानाच त्याच्या आयुष्यात 'त्या' नजरेने बघणारी मुलगी येते. मात्र या प्रेमात मित्र पार्थ भालेराव प्रेमाच्या आड येताना दिसत आहे. आता अभिनयला त्याचे खरे प्रेम मिळणार का, की त्याची प्रेमात निराशा होईल, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.
हा चित्रपट मला खूप जवळचा वाटला : चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाले, या चित्रपटाच्या कथेचा अनुभव मी कॅालेजमध्ये स्वतःही घेतला आहे. त्यामुळे हा चित्रपट मला खूप जवळचा वाटला. प्रत्येकाला हा चित्रपट आपल्या आयुष्याशी जवळचा वाटणारा आहे. त्यामुळेच हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचे मी ठरवले.
हेही वाचा :क्रितीने ३७ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या लाल पोशाखात शेहजादा ट्रेलर लॉन्चला लावली हजेरी
प्रेमात 'बांबू' लागल्याचा आयुष्यात अनुभव येतो : निर्माती तेजस्विनी पंडित म्हणाली, मी खरे तर दोन्ही अनुभवले आहे. माझाही प्रेमभंग झालेला आहे आणि माझ्यामुळे बऱ्याच जणांची प्रेमात निराशा नक्कीच झाली असेल. मला असे वाटते दहा पैकी नऊ जणांना 'मी तुला त्या नजरेने पाहिले नाही' या गाण्याचा किंवा प्रेमात 'बांबू' लागल्याचा आयुष्यात अनुभव येतो. त्यामुळे हा विषय अनेकांना जवळचा वाटेल. यात तरूणाईही आहे आणि शिवाजी साटम, अतुल काळे, समीर चौघुले यांसारखे दिग्गजही आहेत. हा चित्रपट युथ ओरिएंटेड दिसत असला तरी यात कौटुंबिक मनोरंजनही पाहायला मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही 'बांबू' हा चित्रपट बघू शकता. कदाचित असे होईल, तुमचे बाबा, आई, दादा हा चित्रपट पाहून आल्यावर त्यांच्या कॅालेजच्या अशा आठवणी तुमच्यासोबत शेअर करतील.
प्रमुख भूमिका : अभिनय बेर्डे, पार्थ भालेराव आणि वैष्णवी कल्याणकर यांच्यासोबतच शिवाजी साटम, समीर चौघुले, अतुल काळे आणि स्नेहल शिदमही यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत.दिग्दर्शक विशाल देवरूखकर यांचा 'बांबू’ चित्रपट येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. लेखन अंबर हडप यांनी केले आहे. बांबू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून तो सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. यात अभिनेता अभिनय बेर्डे नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.