मुंबई - इमर्जन्सी किंवा आणीबाणी म्हटलं की सर्वांच्याच पोटात गोळा येतो. नुकतीच भारतातील ‘आणीबाणी‘ला ४८ वर्षे पूर्ण झाली. २५ जून १९७५ साली तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. सत्ता आपल्याच हाती राहावी यासाठी केलेला तो प्रयत्न जवळपास दोनेक वर्षे टिकला. या कालावधीत झालेल्या अत्याचारांमुळे नंतर निवडणुकीत नामुष्की पत्करावी लागली कारण त्यांना आणि त्यांच्या पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आजही तो देशाच्या राजकीय इतिहासातील काळाकाळ म्हणून ओळखला जातो. या विषयावर कंगना रानौत इमर्जन्सी नावाचा चित्रपट घेऊन येत असून त्यात ती स्व. इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. याच विषयावर आधारित मराठीमध्ये ‘आणीबाणी’ हा चित्रपट येत असून त्याचा जनतेला कोणताही त्रास होणार नाहीये. किंबहुना या चित्रपट त्यांचे दिलखुलास मनोरंजन करणार आहे.
या ‘आणीबाणी’ चे लेखन सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी केले असून दिनेश जगताप यातून दिग्दर्शनीय पदार्पण करणार आहेत. अरविंद जगताप हे सामाजिक विषयांवर समरसून लिहीत असतात परंतु त्यांनी आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर असलेली ही हलकी-फुलकी गोष्ट या चित्रपटातून मांडली आहे. राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने ते प्रहार करताना दिसतील तसेच ही ‘आणीबाणी’ कोणासाठी जाचक ठरणार आहे, याचे दर्शन चित्रपटातून मिळणार आहे. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या रंजक कथेत नायकाच्या होणाऱ्या गोंधळाची परिस्थिती पाहून प्रेक्षकांना आनंद मिळेल हे नक्की असे ते म्हणाले.
या आणीबाणीतील कलाकार आहेत, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर. या दिग्ग्ज कलाकारांची मोट एकत्र बांधत छोट्या पडद्यावर बरंच काम केल्यानंतर आता मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय मांडला आहे नवोदित दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी. ‘आणीबाणी’ ची निर्मिती केली आहे दिनिशा फिल्म्स' ने तर सहनिर्माते आहेत कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक. अरविंद जगताप यांनी कथा, पटकथा, संवाद लिहिले असून वलय मुळगुंद व प्रसन्न यांच्या शब्दरचनांना संगीतबद्ध केले आहे देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी तर स्वरसाज चढविला आहे हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी. पंकज पडघन यांनी पार्श्वसंगीत दिले आहे तर मंगेश गाडेकर यांनी छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली आहे.
राजकीय विषयावर मिश्किल भाष्य करणारा आणीबाणी येत्या २८ जुलै ला महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे