मुंबई - Ira Khan pre-wedding ceremony :हिंदी चित्रपटसृष्टीतला 'मिस्टर पर्फेक्शनिस्ट' आमिर खानची मुलगी आयरा खान सध्या तिच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचा आनंद घेत आहे. आयराचे आणि नुपूर शिखरेचे प्री- वेडिंगमधील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती लवकरच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या जोडप्यानं साखरपूडा केला होता. त्यानंतर या दोघांच्या लग्नाची वाट अनेकजण पाहत आहे. आयरानं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर मंगळवारी काही फोटो शेअर केले आहेत. तिनं कॅप्शनमध्ये तिच्या चाहत्यांना सांगितले, 'केळवण 2, उखाणा 2, मी यावर खूप प्रेम करते.' फोटोंमध्ये हे जोडपं एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे.
आयरा खाननं फोटो आणि व्हिडिओ केला पोस्ट :फोटोमध्ये तिनं मराठी पारंपारिक लूक ठेवला आहे. ती लाल रंगाचं पातळ नेसलीय. चेहऱ्यावर लाईट मेकअप केला आहे. याशिवाय आयरानं गळ्यात फुलांची माळ घातली आहे. केसाचा बन बांधून तिनं यावर गजरा माळला आहे. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. याशिवाय नुपूरनं पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे. या फोटोंमध्ये आयरा तिच्या होणाऱ्या पतीसोबत पोझ देताना दिसत आहे. तिच्या पोस्टवर अनेकजण तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. यापूर्वी प्री- वेडिंग सेरेमनीमध्ये दोन्ही कुटुंब एकत्र उपस्थित होते.