मुंबई - सुपरस्टार आमिर खानची आई झीनत हुसैन यांची तब्येत बरी नाही. त्यांच्यावर चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. आमिरचं आईसोबत चांगलं बाँडिंग आहे आणि त्याला उपचाराच्या दरम्यान आईसोबत राहायचं आहे.
एका वेबलॉइडनं दिलेल्या माहितीनुसार आमिरच्या आईंवर चेन्नईतील रुग्णालायात उपाचार होणार आहेत. या काळात आमिर आपला मुक्काम नजिकच्या हॉटेलमध्ये करणार आहे. उपचाराच्या वेळी आईसोबत राहून तिची सेवा आणि काळजी घेण्यासाठी आमिरनं हा निर्णय घेतलाय. एका सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या चित्रपट निर्मितीच्या कारकिर्दीसोबतच कुटुंबाला क्वालिटी टाईम देणार असल्याचं सांगताना आमिरनं हा विषय सांगितला.
या वर्षाच्या सुरुवातील आमिर खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी आई झीनत हुसैन यांचा 89 वा वाढदिवस साजरा केला होता. या प्रसंगी पंजाबी गायिका प्रतिभा सिंग बघेल हजर होत्या. त्यांनी सोशल मीडियावर यातील काही फोटो शेअर केले होते. खान कुटुंबीयांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि दिलेल्या प्रेम आणि आपुलकीबद्दल गायिका प्रतिभा यांनी आभार मानलं होतं. या वाढदिवसाच्या आनंदी सोहळ्यात आमिर खानच्या बहिणी निखत आणि फरहत खान, त्याची माजी पत्नी किरण राव आणि त्याची मुलगी इरा खान उपस्थित होत्या. हा सर्व खान परिवार फोटोमध्ये दिसला होता.
कामाच्या आघाडीवर आमिर खान 2007 प्रमाणेच 'तारे जमीन पर' सारख्या चित्रपटाची निर्मिती करण्याच्या विचारात आहे. याशिवाय आमिर खान तीन चित्रपटांची निर्मितीही करणार आहे. यातील एक चित्रपट 'लापता लेडीज'चं दिग्दर्शन किरण राव करेल, तर दुसऱ्या चित्रपटात त्याचा मुलगा जुनेद खान मुख्य भूमिकेत असणार आहे. 'लाहोर 1947' या राजकुमार संतोषीच्या चित्रपटात आमिर खान सनी देओलसोबत झळकणार आहे. आमिर खान अलिकडेच 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात अखेरचा दिसला होता. करीना कपूरनं यात त्याची सहकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळू शकले नव्हते.