मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज आपला ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. अतिशय चतुरसत्र अभिनेता असलेल्या आमिरने नेहमीच निवडक भूमिका करण्यावर भर दिला. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीरेखेसाठी तो वेळ देतो, त्या कॅरेक्टरचा अभ्यास करतो आणि ते पडद्यावर हुबेहुब साकारण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. अलिकडे लाल सिंग चड्ढा हा चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकला नव्हता. त्याअगोदर त्याचा ठग्स ऑफ हिंदुस्थान हा चित्रपटही अपयशी ठरला होता. मात्र या दोन्ही चित्रपटात त्याने साकारलेल्या व्यक्तीरेखा तितक्याच प्रभावी होत्या. लगानमधील भुवन असो की पीकेतील वेंधळा व्यक्ती किंवा दंगलमधील मल्ल प्रत्येक भूमिकेत त्याने प्राण फुंकला होता. आज तो काही काळासाठी सिनेमापासून लांब आहे. परंतु तो लवकरच मेकअप करुन सज्ज होईल आणि आपल्यातील अभिनेत्याला तो पुन्हा यशस्वी बनवेल हे निश्चित आहे. किंबहुना त्याचा चाहतेही तीच अपेक्षा ठेवून आहेत.
त्याचा प्रवास कयामत से कयामतपासून सुरू झाला. पापा कहते है बडा नाम करेगा म्हणत तरुणाईला त्याने पहिल्या चित्रपटापासूनच आपले केले. त्यानंतर तो थांबला नाही. राख, दिल, राजा हिंदुस्थानी, सरफरोश सारख्या चित्रपटातून तो लोकांचे मनोरंजन करत राहिला. दरम्यान 1999 मध्ये आमिर खानने प्रॉडक्शनची स्थापना केली. त्याचा पहिला चित्रपट होता लगान सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकित झाला आणि त्याला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि आणखी दोन फिल्मफेअर पुरस्कार चित्रपटाने मिळवले होते. त्यानंतर त्याचा दिल चाहता है मधील त्याच्या अभिनयालाही दाद मिळाली, पण त्याने नव्या सिमासाठी काही काळ विश्रांती घेतली.
चार वर्षांच्या विश्रांतीनंतर, आमिर खान मुख्य भूमिकेत दिसण्यासाठी परतला, विशेषत: फना आणि रंग दे बसंती या चित्रपटांनी त्याला यशाची जबरदस्त संधी दिली. त्यानंतर आमिरने तारे जमीन पर मधून दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटाने त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. खानचे सर्वात मोठे व्यावसायिक यश चित्रपटांचा विचार करता गजनी (2008), 3 इडियट्स (2009), धूम 3 (2013), पीके (2014), आणि दंगल (2016) हे त्याचे सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आमिरचे असे काही चित्रपट ज्यांना प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतले अशा पाच चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.
१. कयामत से कयामत तक - आमिरने या चित्रपटाआधी अनेक चित्रपटांत बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या होत्या. मात्र, कयामत से कयामत तक खऱ्या अर्थाने त्याचा बॉलिवूड डेब्यू ठरला. त्याच्या या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. याच चित्रपटातून जूही चावलानेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटातील दोघांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. या चित्रपटासाठी आमिरला बेस्ट मेल डेब्यूचा अॅवॉर्डही मिळाला होता.
२. ३ ईडियट्स - आमिर खान, आर माधवन, शर्मन जोशी आणि करिना कपूरसारख्या कलाकारांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. बॉलिवूडच्या नेहमीच्या लव्हस्टोरीपेक्षा अगदीच वेगळी असलेली या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. दोस्त फेल हो जाए तो दुख होता है, लेकीन दोस्त फर्स्ट आ जाए तो ज्यादा दुख होता हैं! सारखे चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आणि तितकेच भावनिक करणारे होते. २०० कोटींचा गल्ला जमवणारा हा आमिरचा पहिला चित्रपट होता.