नवी दिल्ली- आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट रिलीजच्या उंबरठ्यावर आहे. अशावेळी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम खूप मेहनत घेत आहे. दरम्यान आमिर खानचे जुने विधान खोदून काढून त्याच्यावर टीका करणाऱ्यांची एक ट्रोलर्सची फौज कार्यरत झाली आहे. बॉयकॉट लाल सिंग चड्ढा हा ट्विटरवर ट्रेंड ही मंडळी चालवत आहेत. अशावेळी पहिल्यांदाच आमिरने यावर मौन सोडले आहे आणि 'मी जर कुणाचे मन दुखावले असेल तर मला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटते', असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
लाल सिंग चड्ढाच्या प्रमोशनच्यावेळी पीव्हीआरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमिर बोलत होता. यावेळी तो म्हणाला, ''मी जर कुणाचे मन दुखावले असेल तर मला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटते. मला कुणाचेही मन दुखावयचे नसते आणि जर काही लोकांना चित्रपट पाहायचा नसेल तर त्यांचा मी आदर करेन. काय करु शकतो. पण मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी सिनेमा पाहावा कारण आम्ही खूप मेहनत त्यासाठी केली आहे. यात फक्त मी नाही, सिनेमा शेकडो लोकांच्या मेहनतीतून बनत असतो. तेव्हा मला वाटतं की लोकांना हा चित्रपट आवडेल.''
अलीकडे लाल सिंग चड्ढावर बहिष्कार घलण्यासाठीचा हॅशटॅग ( #BoycottLaalSinghCaddha ) वारंवार ट्विटर ट्रेंडमध्ये होत आहे. आमिरने पूर्वी केलेले भारतात असहिष्णुता वाढत असल्याबद्दलचे विधान पुन्हा खोदून काढून त्याला ट्रोल करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीची करिनाची काही वादग्रस्त विधानेही ऑनलाइन होत आहेत.