मुंबई - दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि आमिर खान यांच्यात जबरदस्त केमेस्ट्री असल्याचे यापूर्वी सिद्ध झालंय. थ्री इडियट्स आणि पीके या दोन्ही चित्रपटातून ही जोडगोळी हिट ठरली. आता हीच जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी राजकुमार हिराणी आमिरला घेऊन एक बायोपिक बनवणार असल्याचे समजते. या चित्रपटाची संकल्पना आमिर खानला पसंत पडली आहे. हा चित्रपट अद्याप प्री-प्रॉडक्शनच्या स्थितीत आहे. २०२२ मध्ये बायोपिकच्या प्री-प्रॉडक्शनला सुरुवात झाली आहे.
आमिर खान आणि राजकुमार हिराणी यांनी यापूर्वी अनेक चित्रपटाच्या संकल्पनांवर चर्चा केली आहे. त्यांना अखेर एक विषय मिळाला असून याबाबत दोघांचेही एकमत झाले आहे. ही संकल्पना ऐकल्यानंतर आमिर खान भलताच खूश झाल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिग्दर्शक राजकुमार हिराणी सध्या शाहरुख खान स्टारर डंकी या चित्रपटात गुंतला आहे. शाहरुखसोबतचा हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतरच हिराणी प्रस्तावित चित्रपटाच्या स्क्रिप्ट आणि इतर प्री प्रॉडक्शनच्या कामाला गती देतील. आमिर आणि हिराणी यांच्यातील चित्रपटाची चर्चा सुरुवातीच्या टप्प्यात असली तरी त्याला आकार देण्याच्या निश्चितीस दोघांचीही सहमती आहे. राजकुमार हिराणी आणि आमिर खान २०२४ मध्ये या आगामी बायोपिकच्या शुटिंगला सुरुवात करतील.
लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर खान निराश झाला होता. त्याने काही काळ पडद्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. तो आगामी काळात एखादा चित्रपट दिग्दर्शित करु शकतो. यासाठी तो अनेक स्क्रिप्ट वाचत असल्याचेही समजते. अशातच राजकुमार हिराणीकडून त्याला ऑफर आल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.
शाहरुख खान काम करत असलेल्या राजकुमार हिराणी दिग्दर्शित डंकी चित्रपटात तापसी पन्नू आणि विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. डंकी हा शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी यांचा पहिला एकत्रित सिनेमा आहे.