मुंबई - नवाजुद्दीन सिद्दीकी याने अनेक टक्के टोणपे खात चित्रपटसृष्टीत इथपर्यंत मजल मारलेली आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून उत्तीर्ण झाल्यावर नवाझुद्दीन मुंबईत कामासाठी आला. काही चित्रपटांत नगण्य भूमिका केल्यानंतर विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या कहानी मधील त्याची पोलीस ऑफिसरची भूमिका भाव खाऊन गेली आणि नवाजुद्दीन सिद्दीकी नावाचा चांगला ॲक्टर आहे हे फिल्म इंडस्ट्रीत कळले. नंतर अनुराग कश्यप दिग्दर्शित गँगस् ऑफ वासेपूर मधील त्याच्या भूमिकेची तारीफ झाली आणि त्याच्या करियरला त्याचा फायदा झाला. नंतर आमिर खान बरोबर तलाश, सलमान खान सोबत बजरंगी भाईजान, शाहरुख खान सोबत रईस मध्ये त्याने तगड्या भूमिका करून वाहवाही मिळविली. मांझी : द माउंटन मॅन आणि मंटो सारख्या ऑफ बीट चित्रपटांतून त्याने भूमिका केल्या आणि त्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला. हिरोपंती २ मध्ये त्याने बायल्या व्हीलनची भूमिका साकारली तीही विकृत वाटली नाही. नुकताच त्याची भूमिका असलेला जोगिरा सारा रा रा प्रदर्शित होऊन गेला. आता नवाजुद्दीनची प्रमुख भूमिका असलेला टिकू वेड्स शेरू हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने त्याने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याशी संवाद साधला.
टिकू वेड्स शेरू या चित्रपटाची निर्मिती केली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिने, परंतु तिने या चित्रपट काम केलेले नाहीये. तिने यात प्रमुख भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकीला घेतले असून त्याच्यासोबत नायिकेच्या भूमिकेत आहे टेलिव्हिजन स्टार अवनीत कौर. ही भूमिका त्याच्यापर्यंत कशी आली याबद्दल सांगताना नवाजुद्दीन म्हणाला, 'गेली काही वर्ष मी खूप बिझी आहे. सतत शूट सुरू आहेत म्हणून दोन तीन वर्षांपूर्वी ठरविले की आता अजून जास्त काम हातात घ्यायचं नाही. माझ्या टीमला मी तसं सांगून ठेवलं होतं. लॉकडाऊनच्या आधी मला एक मेसेज आला. तो संदेश कंगनाकडून आला होता ज्यात लिहिले होते, 'मला तुला भेटायचे आहे'. मी त्यावेळेस बंगलोरला होतो आणि तिला तसं कळवलं. आणि ती थेट बंगलोरला पोहोचली. माझ्या व्यस्तपणाबद्दल तिला माझ्या टीमने आधीच सांगितले होते, परंतु तरीही ती बंगलोरला थडकली. मी अवाक झालो. ती म्हणाली, 'एक चित्रपट आहे जो मी प्रोड्युस करीत आहे आणि मला वाटते की त्यात प्रमुख भूमिका तू करावीस.' त्यावर मी म्हणालो की, 'तू इथवर आलो आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी स्पेशल असणार. चल करूया'. खरंतर मी कंगनाच्या कामाचा चाहता आहे. ती नेहमीच आऊट ऑफ द बॉक्स प्रोजेक्ट्स करीत असते आणि म्हणून मी तिला होकार दिला. नंतर तिने स्क्रिप्ट ऐकविली आणि माझ्या तिच्यावरील विश्वासावर शिक्कामोर्तब झाले. अत्यंत सुंदर रोल होता किंवा आहे जो करण्यात मला खूप मजा आली.'
आपल्या रोल बद्दल सांगताना नवाजुद्दीन म्हणाला की, 'टिकू वेड्स शेरू या चित्रपटात मी एका एक्स्ट्राचे काम करीत आहे. तो एका छोट्याश्या गावातून मुंबईत आला आहे चित्रपटांमध्ये नशीब आजमावयाला. गेली अनेक वर्षे तो एक्स्ट्राचे काम करतोय आणि गावात जाताना कॉलर टाईट करून जात असतो. त्याची आई त्याचे लग्न ठरविते. आता त्याचे वय चाळिशी पार करून गेलेले आहे आणि त्याची भावी पत्नी विशीतील आहे. तिला गावातील जीवन आवडतं नसते आणि मुंबईत स्थायिक व्हावयाचे असते. दोघांचे लग्न होते परंतु मुंबईत आल्यावर ती पळून जाते. नंतर अनेक चढउतारांनंतर गोष्ट वेगळं वळण घेते. दिग्दर्शक साई कबीर यांनी उत्तम रीतीने दिग्दर्शन केले असून कंगनाही चित्रीकरणादरम्यान सर्व बाबींवर देखरेख ठेऊन होती.'
एक दोन धमाल किश्श्यांबद्दल सांगताना नवाजुद्दीन म्हणाला की, 'मला या चित्रपटात रोल करताना जुन्या जमान्यातील माझ्या स्ट्रगलिंग डेजची आठवण आली. एका चित्रपटात दहा बारा एक्स्ट्रा हवे होते एकाच सीन साठी. मी देखील त्यातील एक होतो. आम्हाला मेक अप करायला पाठविले. सर्वांचे मेक अप झाल्यावर मेकअपमनने आम्हा सर्वांना एका लाईनीत उभे केले आणि एका हातात पावडर घेऊन त्यावर फुंकर मारत आमच्या समोर फिरला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. आम्ही काही वेळ वाट पाहिली आणि नंतर त्याला विचारले की आमचा मेकअप? तो म्हणाला, 'आत्ताच तर केला की! पावडर घेऊन तुमच्यावर फुंकर मारली तो.' त्यावेळी राग, अपमान, कीव असे सर्व वाटले होते परंतु आता त्यावर हसू येते.
दुसऱ्या एका चित्रपटासाठी मी शूट करीत होतो. आम्ही चंबळमध्ये होतो. आम्ही काहीजण सीनमध्ये होतो आणि अजून काही मंडळी आमच्या आजूबाजूला होती. त्यातील एकजण सारखा माझ्या बाजूला येऊन मला बाजूला सारून कॅमेरा फेस करीत होता. खरं म्हणजे तो तिथे नको होता. एक दोन वेळा असे झाले आणि मग मी त्याला कोपराने बाजूला सारले. तरीही तो प्रयत्न करीत होता तेव्हा त्याला जोराने कोपरा मारला आणि बाजूला ढकलले हे सांगत की, 'तू तुझ्या मार्क वर जा ना...'. मध्ये एक ब्रेक होता आणि आमची चंबळच्या डाकूंवर चर्चा सुरू होती. त्यात मला जे काही समजले ते ऐकून माझे हात पाय थंड झाले. कारण मी ज्या इसमाला कोपरा मारून बाजूला करीत होतो तो एक खराखुरा डाकू होता. त्यानंतर मात्र सीनमध्ये मी त्याला हवा तसा वावरू दिला.'