मुंबई - भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते शहिद भगत सिंग. वयाच्या केवळ २३ व्या वर्षी हसत फाशीवर चढणारे भगतसिंग हे आजही लाखो करोडो तरुणांचे आदर्श आहेत. आपल्या देशातून ब्रिटीश निघून गेले पाहिजेत व इथल्या जनतेचा विचार करणारे स्वदेशी सरकार बनले पाहिजे हा विचार घेऊन भगतसिंग स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात उतरले होते. अशा या जिगरबाज साहसी वीराच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचा मोह फिल्म मेकर्सना पडला नाही तरच नवल. आजवर अनेक हिंदी चित्रपट भगतसिंग व त्यांचे सहकारी यांच्यावर बनले आहेत. आज भगतसिंग यांचा जन्मदिवस आहे. त्याच्या जयंती निमित्य त्यांच्यावर बनलेल्या चित्रपटांविषयी अधिक जाणून घेऊयात.
'द लीजेंड ऑफ भगत सिंग' - अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'द लीजेंड ऑफ भगत सिंग' हा चित्रपट 7 जून 2002 रोजी रिलीज झाला होता, ज्यामध्ये अजय देवगनला भगत सिंगच्या भूमिकेत चांगलीच पसंती मिळाली होती. या चित्रपटासाठी अजयला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
'23 मार्च 1931 शहीद' - बॉबी देओलचा '23 मार्च 1931 शहीद' देखील 2002 मध्येच दिसला होता. हा चित्रपट 7 जून 2002 रोजी प्रदर्शित झाला होता. देओल भाई बॉबी आणि सनी या दोघांनीही या चित्रपटात काम केले होते. बॉबीने भगतसिंगची व्यक्तिरेखा खूप छान साकारली होती आणि सनी चंद्रशेखर आझादच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुड्डू धनोआ यांनी केले होते.
‘शहीद ए आजम’ - सोनू सूदचा 'शहीद-ए-आझम' हा चित्रपटही 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात शमा सिकंदरचीही मुख्य भूमिका होती. हा चित्रपट लोकांना फारसं प्रभावित करू शकला नाही.