मुंबई- हल्ली चित्रपटांमध्ये जुन्या जमान्यातील गाणी घेण्याचा प्रघात पडत चालला आहे. पूर्वी गाजलेले गाणे रिक्रियेट केले जाते आणि नवीन चित्रपटातून नवीन कोरिओग्राफी सकट गुंफले जाते. तसेच ८० आणि ९० चा काल भारतीय चित्रपटसृष्टीच्या संगीतातील मेलडी साठी प्रसिद्ध आहे. आजच्या संगीत म्हणून येणाऱ्या गोंगाटात ती गाणी सुकून देतात. त्यामुळेच अनेक सिनेमा मेकर्स जमेल तेव्हा जुन्या जमान्यातील गाण्यांचा आसरा घेताना दिसतात. मराठीत एक नवीन चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे 'फकाट'. या चित्रपटातील एक नवीन गाणे तुझी माझी जोडी प्रदर्शित करण्यात आले असून त्याला जुन्या जमान्यातील म्हणजेच रेट्रो फील आहे. हे एक प्रेमगीत असून ते हेमंत ढोमे आणि अनुजा साठे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. तुझी माझी जोडी हे गाणे ऐंशीच्या दशकातील चित्रपटांची आठवण करून देते. हे 'माझा पती करोडपती' मधील जुने पण प्रसिद्ध व उडत्या चालीचे गाणे रिक्रियेट करण्यात आले आहे.
तुझी माझी जोडी या गाण्याचे बोल लिहिले आहेत शांताराम नांदगावकर आणि हर्ष, करण व आदित्य यांनी जे 'ट्रिनिटी ब्रदर्स' म्हणून ओळखले जातात. त्यावर स्वरसाज चढविला आहे हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी. संगीताची बाजू 'ट्रिनिटी ब्रदर्स' यांनीच सांभाळली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले असून ते स्वतः मराठी रॅप साठी प्रसिद्ध आहेत. अर्थात त्यांनी 'फकाट' ची निर्मिती सुद्धा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या गाण्यातून एक वेगळा 'साऊंड' सिनेमातून अनुभवायला मिळेल कारण श्रेयश जाधव यांना असलेली संगीताची समज.