मुंबई- फरहान अख्तरने अखेर बहुप्रतीक्षित 'डॉन ३' चित्रपटाबद्दलची अपडेट शेअर केली आहे. त्याने ही घोषणा सोशल मीडियावर शेअर केली असली तरी यात मुख्य डॉनची भूमिका कोण साकारणार ही गोष्ट गुलदस्त्यात ठेवली आहे. परंतु शाहरुख खानने साकारलेल्या 'डॉन'चा वारसदार म्हणून चाहते रणवीर सिंगकडे पाहात आहेत. फरहान अख्तरने त्याच्या इन्स्टाग्रामवर 'डॉन' थीम असलेली छोटी क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये एका नव्या पर्वाची सुरूवात होत असल्याचा उल्लेख आहे.
'डॉन' चित्रपटाचा पहिला भाग २००६ मध्ये रिलीज झाला आणि दुसरा भाग २०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या दोन्ही चित्रपटात शाहरुख आणि प्रियांका चोप्रा जोनास मुख्य भूमिकेत होते. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट या बॅनरने ज्येष्ठ लेखक सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या याच नावाच्या १९७८ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन स्टारर 'ओरिजिनल' चित्रपटाचे हक्क विकत घेतले व त्यानंतर 'डॉन' फ्रेंचायझीला सुरूवात केली.
फरहान अख्तरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी रणवीरचा नवीन 'डॉन' म्हणून अंदाज लावायला सुरूवात केली. रणवीर सिंगचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट हिट होण्याची प्रतीक्षा सुरू होती, असा अंदाजही यानिमित्ताने लावला. गेल्या दोन वर्षात रणवीरला फार चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्याला एका हिट चित्रपटाची आवश्यकता होती. त्यामुळे रणवीर सिंगच 'पुढचा डॉन' असेल असा चाहत्यांकडून अंदाज वर्तवला जात आहे. त्याचवेळी शाहरुखच्या चाहत्यांना मात्र 'किंग खान' शिवाय 'डॉन'ची कल्पना करणे कठीण जात आहे.
'डॉन ३' बद्दल रितेश सिधवानी यांनी मे महिन्यात अपडेट देताना म्हटले होते, 'माझा जोडीदार फरहान अख्तर स्क्रिप्ट पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही पुढे काहीही करणार नाही. सध्या तो स्क्रिप्टवर काम करत आहे, तरीही आपण सर्वजण 'डॉन ३' पाहण्यासाठी उत्सुक आहोत.' या चित्रपटात मुख्य भूमिका नवीन कलाकार असल्याची चर्चा असल्यामुले रणवीर सिंगच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.