मुंबई - बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट आज तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या तिशीमध्ये तिने गाठलेली लोकप्रियतेची उंची महान आहे. आज ती बॉलिवूडची सर्वात आघाडीची अभिनेत्री म्हणून गणली जात आहे. आजवर तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिका तिला या स्थानापर्यंत घेऊन आल्या आहेत. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आलिया भट्टचा समावेश होतो. तिच्या कारकिर्दीची सुरुवात टीकेची झोड उठवण्यापासून झाली. ती फिल्म व्यवसायातील कुटुंबातून आली असल्याने सुरुवातीपासूनच तिच्यावर घराणेशाहीचा आरोप लावण्यात आला. इतकंच नाही तर तिची बौद्धिक पातळीही कमी असल्याची मीडियातून सवंग चर्चा रंगली होती.
आलियाच्या अभिनयाची थट्टा- आलियाचे वडिल महेश भट्ट हे बॉलिवूडमधील प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक आहे. आई सोनी राजदानदेखील कसलेली अभिनेत्री आहे. त्यामुळे तिला अभिनयाचा वारसा उपजतच मिळाला. चित्रपट व्यावसायातील घराम्यातील असल्यामुळे तिला अभिनेत्री म्हणून करियर करणे सोपे होते असे म्हणू शकतो. सुरुवातीला छंद म्हणून तिने अभिनयाला सुरुवातही केली पण खरा कस तिचा इथेच लागणार होता. करण जोहरने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटात तिला मोठी संधी दिली. तिची ५०० मुलींच्या ऑडिशनमधून निवड केली. विशेष म्हणजे यासाठी आलियाने आपले १६ किलो वजन कमी केले होते. यात तिने साकारलेल्या शनाया सिंघानिया या भूमिकेची समिक्षकांनी थट्टा केली. मात्र आलिया हार पत्करणाऱ्यांपैकी नव्हती.
संधीचं सोनं - काही दिवसानंतर तिला इम्तियाज अली यांच्या हायवे या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचे तिने सोनं केलं. किडनॅप करण्यात आलेल्या मुलीची भूमिका तिने अत्यंत ताकदीने साकारली. यासाठी तिने भाषेवर खूप मेहनत घेतली. यासाठी तिला फिल्मफेअरचा क्रिटीक्स चॉइस अवॉर्ड मिळाला आमि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचे नामांकनही मिळाले. तिच्या एकूण कारकिर्दीला कलाटणी देणाऱ्या या हायवे चित्रपटानंतर तिच्या यशाची कमान सतत चढती राहिली आहे.