मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमांची गाथा चित्रपटांतून समोर येताना दिसतेय. शिवकालीन इतिहासातील अनेक अदृश्य पदर उलगडताना दिसताहेत आणि प्रेक्षकांना त्यावेळेच्या अनेक कथा बघायला मिळताहेत. याच कालखंडातील शिवरायांचा एक मावळा, जो ‘वेडात वीर दौडले सात‘ पैकी एक शिलेदार होता, राव जी हा शिवाजी महाराजांच्या जिलेबी पथकातील एक वीर जो आपले रंभाशी होणारे लग्न पुढे ढकलून शत्रूंना अंगावर घेण्यासाठी लढाईत सामील होतो. रावरंभा या चित्रपटात राव आणि रंभा यांच्या प्रणयाबरोबरच मुघलांशी झालेल्या लढायांचा थरार अनुभवायला मिळणार आहे असे दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर संपन्न झाला ज्यावेळी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी उपस्थित होती. ढोल ताशांचा गजरात सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि ऐतिहासिक पारंपरिक वेशभूषा धारण करून या चित्रपटातील कलाकार त्यांचे आदरतिथ्य करताना दिसत होते.
रावरंभा हा एक मल्टीस्टारकास्ट चित्रपट म्हणायला हरकत नाही. यात ओम भूतकर आणि मोनालिसा बागल राव आणि रंभा च्या जोडीत दिसणार असून त्यांच्यासोबत शंतनू मोघे, अशोक समर्थ, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, मीर सरवर, किरण माने, रोहित चव्हाण, पंकज चव्हाण, मयुरेश पेम, अश्विनी बागल, शशिकांत पवार, विनायक चौघुले, शिवम देशमुख, कुणाल मसाले, आदर्श जाधव, रुक्मिणी सुतार, प्रशांत नलवडे आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकांत दिसणार आहेत.