मुंबई: ओटीटीच्या वाढत्या ट्रेंडमुळे चित्रपटांसाठी फक्त बॉक्स ऑफिसची शर्यत जिंकणे पुरेसे नाही, हे चित्रपट व्यावसायिकांच्या केव्हाच लक्षात आले आहे. आता व्यवसायात तग धरायचा असेल तर ओटीटी लढाई जिंकण्यावाचून पर्याय नाही. बॉक्स ऑफिसवर चित्रपट जितका हिट, तितकीच त्याला ओटीटीवर मागणी अधिक, हे साधे सरळ समीकरण. यामुळेच अक्षय कुमार, अजय देवगण सारखे स्टार्स या शर्यतीत ओटीटीची स्पर्धा कमालीच्या गांभीर्याने घेतात. त्यातच हिंदी चित्रपटसृष्टीतला 'बादशाह' आता 'पठाण' च्या रुपात या स्पर्धेत दाखल झाला. त्याआधी अक्षय कुमार, अजय देवगणच्या चित्रपटांनी ओटीटीवर मोठी कमाई करून आपली जागा बनवली आहे. कुठले चित्रपट किती किमतीत ओटीटीवर विकले गेले, हे जाणून घेऊ या.
लक्ष्मी बॉम्ब :अक्षय कुमार या शर्यतीत अव्वल ठरला आहे. त्याचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारने तब्बल १२५ कोटींना विकत घेतला होता. या चित्रपटाची चित्रपटरसिकांमध्ये खूप चर्चा झाली होती. अक्षयइतकीच मराठमोळ्या शरद केळकरनेही रसिकांची वाहवा मिळवली.
भुज- द प्राइड ऑफ इंडिया : 'लक्ष्मी बॉम्ब'नंतर अजय देवगणचा 'भुज- द प्राइड ऑफ इंडिया' हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने या चित्रपटासाठी सर्वाधिक रक्कमही दिली आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मने हा चित्रपट ११० कोटींना विकत घेतला होता.
सड़क २ : ज्या चित्रपटाचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे ते म्हणजे संजय दत्त आणि पूजा भट्ट यांचा चित्रपट 'सडक'चा सीक्वेल चित्रपट 'सडक २'. हा चित्रपट देखील डिस्ने प्लस हॉटस्टारने ७० कोटींना विकत घेतला होता.
गुलाबो सिताबो : अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्यातील चटपटीत, रंजक संभाषणावर आधारित या चित्रपटाचे हक्क अॅमेझॉन प्राइमने विकत घेतले होते. चित्रपटाच्या हक्कांसाठी अॅमेझॉन प्राइमने ६५ कोटी रुपये दिले होते. ओटीटीवर प्रदर्शित झालेला हा पहिला मोठ्या बजेटचा चित्रपट होता. कोरोनाकाळात अक्षरशः घरात बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांची या चित्रपटाने चांगलीच करमणूक केली.
गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल : या चित्रपटात जान्हवी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. नेटफ्लिक्सने चित्रपटासाठी ५० कोटी रुपये दिले आहेत.