मुंबई - 72 हुरेन या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा झाल्यापासून वादाच्या बोवऱ्यात सापडला आहे. एका वेगळ्या आणि संवेदनशील विषयावरचे कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर २८ जून रोजी रिलीज करण्यात आलाय. हा चित्रपट दहशतवादाची गडद बाजू अलगडून दाखवते आणि ट्रेलरमध्येही तेच पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची संपूर्ण कथा दहशतवादावर आधारित आहे. यामध्ये लोकांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी बनवून निष्पाप लोकांना मारण्यासाठी समाजात कसे सोडले जाते हे दाखवण्यात येणार आहे. 72 हुरेनच्या ट्रेलरनुसार, दहशतवाद्यांचा असा विश्वास आहे की जे लोक आपल्या प्राणांची आहुती देऊन हत्या करतात, त्यांना देव स्वर्गात आश्रय देतो.
कसा आहे चित्रपटाचा ट्रेलर? - २७ जून रोजी सीबीएफसी (सेन्सॉर बोर्ड) ने याआधी चित्रपटाचा ट्रेलर वादग्रस्त मानून नाकारला होता. मात्र २८ जून रोजी हा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलाय. या ट्रेलर रिलीजवरुन या चित्रपटाचे सहनिर्माते अशोक पंडित हे सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाशी असहमत होते. अखेर हा ट्रेलर रिलीज झाल्यामुळे त्यांच्यात समझोता झाला आहे की नाही हे समजलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पुरण सिंग चौहान यांनी केले आहे.
काय आहे ट्रेलरवरून वाद?- विशेष म्हणजे, सेन्सॉर बोर्डाने हा ट्रेलर प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेचा विचार न करता आणि त्रासदायक असल्याचे सांगत नाकारला होता. त्यामुळेच या चित्रपटाच्या ट्रेलरला ग्रीन सिग्नल देण्यात आला नाही. इकडे अशोक पंडित यांनी सेन्सॉर बोर्डावर बरसताना मोठे आरोप केले आहेत. धार्मिक दहशतवाद्यांचे ब्रेन वॉशींग करताना त्यांना काही आमिष दाखवली जातात. त्यामध्ये तुम्ही करत असलेली कार्य हे धर्मासाठी कसे आवश्यक आहे आणि यामुळे तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होणार असल्याचे डोक्यात भरवले जाते. जेव्हा तुम्ही या जगातून परलोकात जाल तेव्हा तुमच्या स्वागताला स्वर्गातील ७२ कुमारिका असतील, अशा प्रकारे मेंदूमध्ये घुसवले जाते. याच विषयावर आधारित हा चित्रपट असल्यामुळे त्याला काही संघटना विरोधही करत आहेत. या चित्रपटामुळे देशात धार्मिक धृवीकरण होऊ शकते असाही एक दावा काही गटाकडून केला जात आहे.
चित्रपटाची स्टार कास्ट - चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे तर अभिनेता पवन मल्होत्रा (हकीम अली) आणि आमिर बशीर (बिलाल अहमद) हे चित्रपटात दहशतवादी म्हणून दिसत आहेत. ७२ हूरेन हा चित्रपट हिंदी, बंगाली, आसामी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, मराठी, पंजाबी, काश्मिरी आणि भोजपुरी या भाषांमध्ये ७ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.