मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतला तिच्या थरारक हवाई अॅक्शन चित्रपट तेजसकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्रया चित्रपटाकडं प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांनी तेजस ऐवजी विक्रांत मॅसीच्या '12th Fail' चित्रपटाची तिकीटे घेणं पसंत केलं. बॉक्स ऑफिसवर झालेल्या '12th Fail' विरुद्ध तेजस या टक्करीमध्ये कंगनाच्या चित्रपटाला अपयश आलं. आता या दोन रिलीजच्या बॉक्स ऑफिस परफॉर्मन्सवर एक नजर टाकूयात.
इंडस्ट्री ट्रॅकर Sacnilk च्या मतानुसार तेजसची थिएटर्समधील सुरुवात तुलनेने संथ गतीनं झाली. पहिल्या सहा दिवसांत भारतात एकूण 5.15 कोटी रुपयांची कमाई होऊ शकली. त्यात आणखी 40 लाखाची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील एकूण संकलन अंदाजे 5.55 कोटी रुपये होईल. सर्वेश मेवारा दिग्दर्शित तेजस हा चित्रपट देशाच्या रक्षणासाठी समर्पित भारतीय वायुसेना (IAF) अधिकाऱ्याभोवती फिरणारा आहे. कंगना तेजस चित्रपटात अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी आणि विशाक नायर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
दरम्यान, Sacnilk च्या मतानुसार '12th Fail' ने थिएटरमध्ये जोरदार सुरुवात केली होती. चित्रपटगृहांमध्ये सहा दिवसांत भारतात निव्वळ कमाई म्हणून 11.74 कोटी रुपयांची प्रभावी कमाई केली. सातव्या दिवशी, सुरुवातीच्या अंदाजानुसार चित्रपट सर्व भाषांमध्ये आणखी 1.30 कोटी रुपये कमवू शकतो. अशा तऱ्हेनं बॉक्स ऑफिसवर '12th Fail' चं 13.04 कोटी रुपयांचे एकूण संकलन होईल.