मुंबई- आशयघन सिनेमा हे मराठी चित्रपटसृष्टीचे श्रद्धास्थान आहे. त्यातील अनेक चित्रपट जगभरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचा भाग होताना दिसतात. जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अमेरिकेतील फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या आकृती क्रिएशन्स निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित दिग्दर्शित बनी या एकमेव मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. बनीचे स्क्रिनिंग येत्या २७ ऑगस्ट २०२२ रोजी, सायंकाळी ७.२० वा. टेम्पल लाइव्ह येथे होणार आहे. बनीच्या शीर्षक भूमिकेत बालकलाकार सान्वी राजे सोबत शैलेश कोरडे व शीतल गायकवाड या कसदार कलाकारांनी प्रमुख भूमिका समरसून निभावली आहे.
बनी चित्रपटाच्या कथानकाबद्दल लेखक दिग्दर्शक निलेश उपाध्ये म्हणाले, "विवेक नावाच्या व्यक्तीने १० वर्षाच्या बनीला जगापासून दूर, अलिप्त ठेवले आहे. असे करण्यामागे त्याचे स्वत:चे अनेक तर्क आणि कारणे आहेत. कालांतराने बनी जगाकडे विवेकच्या नजरेतून बघू लागते. तो जे सांगेल ते ती खरे मानू लागते. परंतू त्याच वेळी बनीचे स्वत:चेही विश्व तयार होत आहे. आणि कालांतराने विवेक आणि बनीचा हा प्रवास एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचतो. बनी हा चित्रपट सामाजिक मानसिक थरारपट असून आजच्या ज्वलंत सामाजिक विषयासंबंधित आहे."
अनेक यशस्वी चित्रपटांच्या कार्यकारी निर्मितीची धुरा सांभाळणाऱ्या शंकर धुरी यांचे निर्माता म्हणून हे प्रथम पदार्पण आहे. चित्रपटाच्या या यशाबद्दल ते म्हणाले, "विलक्षण कथा आणि उत्तम टीमवर्कमुळे आज 'बनी' सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. नवोदित दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांच्या सृजनशील विचारांनी अत्यंत वेगळ्या धाटणीचा विषय, दिग्दर्शकाच्या मनातील हे तरल भावोत्कट नाट्य सिनेमॅटिक अँगलने डीओपी कार्तिक काटकर यांच्या मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असे म्हणता येईल."