हाँगकाँग - लोकप्रिय चीनी गायिका कोको ली हिचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले आहे. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असे तिच्या मोठ्या बहिणी कॅरोल आणि नॅन्सी ली यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून चाहत्यांना कळवले आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून तिची प्रकृती खूपच खालावली होती असे म्हटलंय. कोको लीने आठवड्याच्या शेवटी घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि हे लक्षात येताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ती कोमात होती आणि बुधवारी तिचा मृत्यू झाला, असे तिच्या बहिणीने सांगितले.
हाँगकाँगमध्ये जन्मलेली चीनी गायिका कोको ली हिने सॅन फ्रान्सिस्कोमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. हाँगकाँगमधील टीव्हीबीने आयोजित केलेल्या वार्षिक गायन स्पर्धेत प्रथम उपविजेतेपद पटकावल्यानंतर ती एक गायिका बनली आणि १९९४ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी तिचा पहिला अल्बम रिलीज झाला. लीने सुरुवातीला मँडोपॉप गायिका म्हणून सुरुवात केली, परंतु नंतर ती गायिका बनली. तिच्या जवळपास ३० वर्षांच्या कारकिर्दीत कँटोनीज आणि इंग्रजीमध्ये अल्बम रिलीज केले. ती तिच्या दमदार आवाजासाठी आणि लाइव्ह परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध होती.
कोको लीने आंतरराष्ट्रीय संगीताच्या क्षेत्रात चीनी गायकांसाठी एक नवीन जग उघडण्यासाठी अथक परिश्रम घेतले. यामुळे ती चिनी गायकांसाठी प्रेरणास्त्रोत होती, असे तिच्या बहिणींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आम्हाला तिचा अभिमान आहे! अमेरिकन मार्केटमध्ये प्रवेश करणारी ती पहिली चीनी गायिका देखील होती आणि तिचे इंग्रजी गाणे डू यू वॉन्ट माय लव्ह डिसेंबर १९९९ मध्ये बिलबोर्डच्या हॉट डान्स ब्रेकआउट्स चार्टवर चौथ्या क्रमांकावर आले होते.
कोको लीने डिस्नेच्या मुलानच्या मँडरीन आवृत्तीमध्ये नायिका फा मुलानचा आवाज होती आणि चित्रपटाच्या थीम सॉन्ग रिफ्लेक्शनची मँडरिन आवृत्ती देखील तिने गायली होती. २०११ मध्ये कोको लीने ब्रूस रॉकोविट्झ या कॅनेडियन उद्योगपतीशी लग्न केले. रॉकोविट्झसोबतच्या लग्नानंतर तिला दोन सावत्र मुली होत्या, पण लीला स्वतःची मुले नव्हती.
३१ डिसेंबर २०२२ रोजीच्या लीच्या सर्वात अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये, तिने प्रेम आणि विश्वास या शब्दांचे टॅटू तसेच तिच्या शरीरावर ड्रेनेज पिशवी बांधलेली दिसत असलेल्या फोटोसह स्वतःचे अनेक फोटो शेअर केले होते. 'प्रेम आणि विश्वास हे माझे दोन आवडते शब्द आहेत जे मी माझ्या हृदयात कायमपणे जपून ठेवलेत. कठीण काळातून जाताना त्यांची मला गरज होती', असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते.