महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

निवडणूक आचारसंहिता पथकाकडून भिवंडीत २ वेगवेगळ्या कारवाईत १२ लाख जप्त

आचारसंहिता पथकाने आतापर्यंत एकूण ३ कारवाईत १६ लाख ६४ हजार ६०० रुपये जप्त केले आहेत.

By

Published : Apr 5, 2019, 8:27 PM IST

Money

ठाणे -निवडणुकीसाठी मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैशांचा वापर होण्याची भीती असल्याने आचारसंहिता पथकाकडून नाके स्थापन करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भिवंडीत आचारसंहिता पथकाने २ वेगवेगळ्या कारवाईत २४ तासात १२ लाख १४ हजार ६०० रुपये जप्त केले आहेत.

भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात कारीवली नाका या ठिकाणी आचारसंहिता पथकाकडून नियमीत वाहन तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी इनोव्हा कारमधील एका सुटकेसमध्ये दहा लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. कार ही मारु एंटरप्रायझेसचे हितेश मारु या कापड उत्पादकाची आहे. त्यांनी दैनंदिन व्यवहारासाठी रक्कम बाळगल्याचे सांगितले. परंतु, रक्कम कोठून आणली याचे ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.


आचारसंहिता पथक प्रमुख अतिरिक्त गटविकासाधिकारी अविनाश मोहीते व जयवंत माने यांनी रक्कम जप्त केली. भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. घटनेची माहिती कळताच कल्याण येथील आयकर विभागाच्या पथकानेही भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत चौकशी सुरू केली आहे.


रात्रीच्या कारवाईतही कारमधून २ लाख १४ हजार ६०० रुपये जप्त -
भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात साईबाबा नाका या ठिकाणी रात्रीच्या वेळी आचारसंहिता पथकाकडून शहरात येणाऱ्या वाहनांची रात्री तपासणी सुरू होती. स्विफ्ट डिझायरची तपासणी करीत असताना कारमधील डिक्कीत असलेल्या सुटकेसमध्ये २ लाख १४ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. कारमालक शांतीलाल जैन यांच्याकडे रोख रक्कमेबाबत चौकशी केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ न शकले नाहीत. ही रक्कम आचारसंहिता पथकातील अधिकारी सुभाष झळके व सुनील भोईर यांनी जप्त करून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आचारसंहिता पथकाने आतापर्यंत एकूण ३ कारवाईत १६ लाख ६४ हजार ६०० रुपये जप्त केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details