शिवसेनेचं ठरलं! युती तुटण्याचे " हे " ठरणार निमित्त ? - अदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
शिवसैनिकांत उत्साह आहे. अशा स्थितीत अदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढल्यास शिवसेनेला फायदा होईल असे सेनेच्या एका गटाला वाटत आहे. त्यामुळे युतीत कमीपणा घेऊन सबळावर लढलेलं बरं अशी मानसिकता शिवसेना नेतृत्वाची झाली आहे. त्यामुळे अधिक वाट न पहाता कोणत्याही क्षणी शिवसेना स्वबळावर लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
मुंबई- शिवसेना भाजप युती होणार का? झाली तर काय फॉर्म्यूला असेल? याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तूळात आहे. मात्र शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेत स्वबळावर लढण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर पणे १४४ जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळवार लढण्याचे स्पष्ट केले आहे. मात्र भाजप कोणत्याही स्थितीत १४४ जागा शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. उलट शिवसेनेच्या ताब्यातील अनेक मतदारसंघावरच भाजपने दावा केला आहे. अशा स्थितीत शिवसेनेतील एक मोठा गट स्वबळावर लढण्याच्या बाजूने आहे. पक्षश्रेष्ठींनाही आता नाही तर कधीच नाही याची चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे युती तुटल्याची घोषणा ते कोणत्याही क्षणी करू शकतात, असे शिवसेनेतील विश्वसनीय सुत्रांकडून समजते.
जागा वाटप आणि जागांची आदला बदली
भाजपचे सध्या १२३ आमदार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीकडून आलेल्या आमदारांची संख्या जवळपास डझनभर आहे. हे गणित पाहता शिवसेनेला १४४ जागा भाजप कोणत्याही स्थितीत सोडणार नाही हे स्पष्ट आहे. त्यात वडाळा, कलिना, मागाठाणे, महाड, कुडाळ, दापोली, गुहागर, यासारख्या शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. तर शिवसेनेला भाजपच्या ताब्यातील काही मतदारसंघ हवे आहेत. त्यात गोरेगाव, विलोपार्ले, दहिसर, ठाणे, कल्याण पश्चिम, वर्सोवा या मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ जे आता भाजपच्या ताब्यात आहेत, ते पुन्हा शिवसेनेला देण्यास भाजपचा नकार आहे. मात्र ते मिळालेच पाहिजेत ही स्पष्ट भूमिका शिवसेनेची आहे.
आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
सत्तेतील वाटप हा ही युतीतील कळीचा मुद्दा आहे. शिवसेनेला जशा १४४ जागा हव्या आहेत. तसे सत्तचे वाटपही समान हवे आहे. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद सेनेकडे देण्याची मागणी आहे. मात्र ती मागणीही भाजपने मान्य केली नाही. महत्वाच्या खात्यांचे वाटपही निम्मे झाले पाहीजे. मात्र महत्वाची खाती शिवसेनेच्या पदरात टाकण्यात भाजप नेतृत्व तयार नाही. युतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून अदित्य ठाकरेंना प्रोजेक्ट केलं जावं ही शिवसेनेची मागणी आहे. शिवाय मोठा भाऊ शिवसेनेचा असेल, तो अधिकार सोडू नका असा दबाव शिवसैनिकांचा आहे.
शिवसैनिकांचा दबाब
अदित्य ठाकरेंनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यांना मिळालेला प्रतिसादही जबरदस्त आहे. त्यामुळे शिवसैनिकांत उत्साह आहे. अशा स्थितीत अदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढल्यास शिवसेनेला फायदा होईल, असे सेनेच्या एका गटाला वाटत आहे. त्यामुळे युतीत कमीपणा घेऊन स्वबळावर लढलेलं बरं अशी मानसिकता शिवसेना नेतृत्वाची झाली आहे. त्यामुळे अधिक वाट न पाहता कोणत्याही क्षणी शिवसेना स्वबळावर लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.