परभणी- पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत आम्ही पाकिस्तानचे एक विमान पाडले आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सांगत आहेत आम्ही दिलेली सर्व विमाने पाकिस्तानात सुरक्षित आहेत. मग खरे काय आणि खोटे काय? अमेरिकेचे अध्यक्ष खोटे बोलत असतील तर, मोदींनी भारतवासीयांना सांगावे, असे आव्हान वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना दिले आहे.
प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार आलमगीर खान यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींना आव्हान दिले. प्रचारसभेच्या व्यासपीठावर उमेदवार आलमगीर खान, जिल्हा समन्वयक डॉ. धर्मराज चव्हाण, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख इम्तियाज होते. सभेला पाथरी, सोनपेठ, सेलू आणि मानवत तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.