गडचिरोली: गडचिरोली-चिमूर मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी ‘मुक्तिपथ’ च्या आवाहनाला प्रतिसाद देत एक संकल्प केला आहे. या निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचा वापर न करण्याचा संकल्प या उमेदवारांनी जाहीर केला आहे. गडचिरोलीतील सहाशे दारूमुक्त गाव आणि दारू बंद ठेवण्यासाठी लढणाऱ्या स्त्रियांच्या मागणीला राजकीय नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
गडचिरोलीत 'दारूमुक्त निवडणूक' 'सर्च'चे संचालक व मुक्तिपथ चे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी या निर्णयाचे स्वागत करून सर्व उमेदवारांचे आभार मानले. “दारूमुक्त निवडणूक या अभियानामुळे निवडणुकीत बेकायदा दारूचा वापर व उमेदवाराचा खर्च कमी होईल. सोबतच मतदार पूर्ण शुद्धीत आपल्या विवेकाने मतदान करेल. हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
गडचिरोलीत 'दारूमुक्त निवडणूक'
या लोकसभा निवडणुकीसाठी गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील प्रमुख उमेदवार अशोक नेते (भाजप), डॉ. नामदेव उसेंडी (कॉंग्रेस), डॉ. रमेश गजबे (वंचित बहुजन आघाडी), देवराव नन्नावरे (आंबेडकराइट पार्टी), हरिश्चंद्र मंगाम (बसपा) या सर्वांनी लिखित स्वरूपात आपला हा संकल्प मुक्तिपथच्या स्वाधीन केला आहे. मुक्तिपथ तर्फे तो गुरुवारी जाहीर करण्यात आला.
गडचिरोलीत 'दारूमुक्त निवडणूक' ज्याप्रमाणे विमानाचा वैमानिक, वाहनाचा चालक हा दारूच्या नशेत नको. त्या प्रमाणेच लोकशाहीचा चालक असणारा मतदार देखील मतदान करताना दारूच्या नशेत नको. म्हणून ‘ही निवडणूक, दारूमुक्त निवडणूक’ असे आवाहन मुक्तिपथ तर्फे या जिल्ह्यात करण्यात आले आहे. दारूमुक्त निवडणुकीच्या या अभिनायानात ‘जो आमच्या नवऱ्याला पाजेल दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ अशी स्त्रियांची घोषणा आहे.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी शेखर सिंग व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी निवडणुकीत दारूचा गैरवापर थांबविण्यासाठी शासनातर्फे कारवाई सुरू केली आहे. यासाठी जागोजागी वाहनाची तपासणी, बेकायदा दारूची जप्ती व वारंवार दारूचा गुन्हा करणाऱ्यांना तडीपार केले जात आहे. ‘निवडणूक जनशिक्षण कार्यक्रमांतर्गत लोकांना याबाबत माहिती दिली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी(१९९३), दारू-तंबाखू मुक्तीसाठी ‘मुक्तिपथ’ अभियान(२०१६) व आता ‘दारूमुक्त निवडणूक’ अशा उपक्रमांमुळे दारू नियंत्रणाचे एक मॉडेल या जिल्ह्यात उभे राहत आहे. विशेष म्हणजे यात शासन, स्वयंसेवी संस्था, ग्रामसभा, स्त्रिया व आता राजकीय उमेदवार या सर्वांचा सहभाग आहे. “महाराष्ट्राच्या जनतेने, स्वयंसेवी संस्था व सामाजिक चळवळींनी आणि जागृत नागरिकांनी पुढाकार घेऊन आपापल्या मतदार संघातील निवडणूक दारूमुक्त ठेवण्यासाठी मतदारांना व राजकीय उमेदवारांना आवाहन करावे. जो उमेदवार मतदारांना दारू पाजेल त्यावर बहिष्कार टाकावा. हा एका प्रकारचा जनतेचा जाहीरनामा बनावा”, असे आवाहन डॉ. अभय बंग यांनी केले आहे.