मुंबई- राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे. भाजप प्रवेशाची ते वाट पहात आहेत. त्यांचा प्रवेश हा शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे या आधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राणे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत नक्की करायचे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
शिवसेना भाजप युती होवू नये अशी नारायण राणेंची इच्छा आहे. तसे झाल्यास राणेंचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. भाजपनेही राणेंना थांबा आणि वाट पहा, असा निरोप दिला आहे. त्यांच्याकडे सध्यातरी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मात्र, भविष्यात काय होईल याचा विचार न करता राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मार्फतच निवडणुकीची तयारी करत आहे. राणे यांची सिंधुदूर्ग जिल्ह्यात ताकद आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग या जिल्ह्यात आहे. त्यातही मालवण आणि देवगड मतदारसंघात त्यांच्या बाजूने वातावरण आहे. सावंतवाडीमध्ये मात्र गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांचे तगडे आव्हान त्यांच्या पुढे आहे.
राज्याचे नेतृत्व केलेले राणे सध्या सिंधुदूर्ग पुरतेच मर्यादीत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वत:च्या पक्षाकडून निवडणूक लढवतानाही त्यांना मर्यादा येणार आहे. तसे झालेच तर ते सिंधुदूर्ग वगळता इतर उमेदवार उभे करण्याचे धाडस करणार नाहीत. तसे केले तरी त्याला मिळाणारा प्रतिसाद किती असेल, या बाबत साशंकता आहे. याची पूर्ण जाणीव राजकारणात कसलेल्या राणेंना आहे.