महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

अहमदनगर : सुजय-संग्रामच्या प्रचार'तोफा' आज थंडावणार - सुजय विखे

राज्यात ज्या विशेष लढती आहेत, त्यात प्रमुख लक्षवेधी लढत असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप विरुद्ध युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. येत्या २३ एप्रिलला मतदान होणार असल्याने आज (रविवार) सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

अहमदनगर

By

Published : Apr 21, 2019, 12:50 PM IST

Updated : Apr 21, 2019, 2:52 PM IST

अहमदनगर - राज्यात ज्या विशेष लढती आहेत, त्यात प्रमुख लक्षवेधी लढत असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप विरुद्ध युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. येत्या २३ एप्रिलला मतदान होणार असल्याने आज (रविवार) सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकूण १९ उमेदवार असले तरी, अधिकृत पक्षांचे तीनच उमेदवार आहेत. त्यात आघाडी, युतीसह बहुजन समाजवादी पक्षाचे वाकळे अपक्ष उमेदवार असून, अपक्ष संजीव भोर तर वंचित आघाडीचे सुधाकर आव्हाड यांनीही प्रचारात ठसा उमटवला आहे. तरीही प्रमुख लढत सुजय विखे आणि संग्राम जगताप यांच्यातच होत असल्याचे दिसून येत आहे.

अहमदनगर

आज सायंकाळी ५ वाजता प्रचाराची सांगता होणार असून २३ तारखेला मतदारराजा कोणाच्या पारड्यात विजयाची माळ टाकतो, हे पुढील महिन्यात 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे. एकूणच या मतदारसंघात पाहिल्यास डॉ. सुजय विखे हे गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्याने आणि या जागेवर शेवटपर्यंत राष्ट्रवादी पक्षाने हक्क सांगितल्याने अखेर सुजय विखे यांनी धक्कातंत्र अवलंबत भाजपमध्ये प्रवेश करून या ठिकाणची उमेदवारी मिळवली. त्यासाठी विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे खासदार दिलीप गांधी प्रचार काळात नाराज असल्याचे चित्र वारंवार समोर आले.

प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही एक प्रचंड अशी सभा नगरमध्ये पार पडली. मात्र, दिलीप गांधींची नाराजी आणि डॉ. सुजय यांच्या बद्दलच जास्त चर्चा चालली. त्याचबरोबर युतीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी वेळोवेळी मतदारसंघातल्या विविध तालुक्यात हजेरी लावत सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी आवाहन केले. पंकजा मुंडे, स्मृती इराणी, राम शिंदे, गिरीश महाजन, महादेव जानकर आदी नेत्यांनी सुजयसाठी प्रचारसभा घेतल्या. दुसरीकडे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीपासून विशेष लक्ष दिल्याचे समोर आले. नगरसह त्यांनी इतर तालुक्याच्या ठिकाणी सभा घेतल्या त्याचबरोबर धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यात तळ ठोकत एक प्रकारे आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. आज जाहीर प्रचार संपत असताना मतदार कुणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार याची उत्सुकता आहे. एकूणच ही निवडणूक जनतेच्या लक्षात राहणारी अशीच राहणार आहे.

Last Updated : Apr 21, 2019, 2:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details