पुणे -महाराष्ट्रातील लक्षवेधी लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती हा एक प्रमुख मतदार संघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या अभेद्य गडाला यावेळी खिंडार पाडण्याचा चंग भाजपने बांधला आहे. भाजपने दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने बारामती लोकसभा मतदारसंघाची चुरस चांगलीच वाढली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांच्याकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना पडणारी मते निर्णायक भूमिका बजावतील, अशी सध्या परिस्थिती आहे.
मागील काही दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सातत्याने बारामतीसह राज्यातल्या ४८ जागा जिंकू असा दावा करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच भाजपकडून सुप्रिया सुळे यांना टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार देण्यात आला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सद्याची राजकीय परिस्थिती -
भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. कांचन कुल यांचे बारामती लोकसभा मतदारसंघात असलेले नातंगोत, आमदार कुल यांची दौंड मध्ये असलेली ताकद तसेच पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्याकडून होत असलेला जोरदार प्रचार सुप्रियांना धक्का देणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सोबतच भाजपकडून बारामती लोकसभा मतदार संघावर कब्जा मिळवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सहकारी बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. यामुळे या निवडणुकीची चुरस आणखीनच वाढली आहे.
या मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे चांगलाच जोर लावताना दिसत आहेत. मागील निवडणुकांपेक्षा यंदाची निवडणूक सोपी नाही, याची जाणीव राष्ट्रवादीला झालेली दिसते. खडकवासला, दौंड, पुरंदर यासारख्या अडचणीचा ठरू शकणाऱ्या विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे डोअर टू डोअर प्रचारावर भर देताना दिसत आहेत. पुरंदर तसेच इंदापूर आणि भोर या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस चांगली ताकद आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काठीच्या राजकारणाचा फटका सुप्रिया सुळे यांना बसण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादीकडून इथल्या काँग्रेस नेत्यांची मनधरणी करण्यात आली आहे. इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे काँग्रेसचे स्थानिक नेते आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्यासोबत मनोमिलन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेला आहे.
भाजपकडून बारामतीमध्ये लावली जात असलेली जोरदार ताकत लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावेळी मोठ्या गांभीर्याने बारामतीकडे लक्ष दिलेले आहे. एकंदरीतच बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा मोठ्या चुरशीची होईल असेच दिसून येत आहे.
लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या विधानसभानिहाय सध्याचे आमदार -
बारामती लोकसभेअंतर्गत येणाऱ्या ६ पैकी रासप १, राष्ट्रवादी २, काँग्रेस १, शिवसेना १, भाजप १ असे प्राबल्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसच्या आश्वासक मदतीची गरज पडणार आहे. जिल्ह्यातील इतर संस्थांमधील सत्ता केंद्रांचा विचार केला तर पुणे जिल्हा परिषद आणि बारामती नगरपालिका ही राष्ट्रवादीकडे आहे. सासवड, इंदापूर भोर या नगरपालिका काँग्रेसकडे आणि दौंड नगरपालिका स्थानिक आघाडीने जिंकली आहे.
२०१४ च्या निवडणूकीचा निकाल -